आयातीत उमेदवारांनाही जनतेद्वारे संधी
By Admin | Updated: October 19, 2014 23:59 IST2014-10-19T23:59:40+5:302014-10-19T23:59:40+5:30
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचाराचा पगडा होता़ शिवाय काँगे्रसविरोधी लाट होती़ विधानसभा निवडणुकीतही ही लाट कायम राहील, असे वाटत होते़ यामुळे अनेकांनी काँग्रेस,

आयातीत उमेदवारांनाही जनतेद्वारे संधी
वर्धा : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचाराचा पगडा होता़ शिवाय काँगे्रसविरोधी लाट होती़ विधानसभा निवडणुकीतही ही लाट कायम राहील, असे वाटत होते़ यामुळे अनेकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे सोडून भाजपामध्ये प्रवेश घेतला़ वर्धा जिल्ह्यातही आयातीत दोन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनीच भाजपाची लाज राखली़ प्रस्थापित माजी खासदार व विद्यमान आमदारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले तर आयातीत उमेदवारापैकी हिंगणघाटमध्ये कुणावार यांनी मताधिक्याने विजय मिळविला. वर्धेतही भोयर यांनी समाधानकारक मते घेत विजयाची माळ गळ्यात घालून घेतली़
वर्धा विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार डॉ़ पंकज भोयर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये प्रवेश केला़ लोकसभा निवडणुकीत माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांचा पराभव झाला़ यानंतर सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या कारणावरून दत्ता मेघे यांनी काँगे्रसचा त्याग करून भाजपाला जवळ केले़ त्यांच्यासोबतच युवक काँगे्रसमध्ये सक्रीय असलेल्या डॉ़ पंकज भोयर यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता़ हिंगणघाट विधानसभा मतदार संघातही उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी समीर कुणावार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला़ भाजपानेही विजयाची खात्री लक्षात घेत वर्धा मतदार संघात डॉ़ पंकज भोयर तर हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांना उमेदवारी बहाल केली़ यातील हिंगणघाट मतदार संघात गत निवडणुकीत ४१ हजारांवर मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कुणावार यांना पक्षाचे बळ मिळताच त्यांनी भरारीच घेतली़ यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ८९ हजार ९१२ मते घेत तब्बल ६५ हजार २५ मतांनी विजय मिळविला़ मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या मतांपर्यंतही पोहोचता आले नाही़ बसपाचे उमेदवार प्रलय तेलंग यांनी २४ हजार ८८७ मते घेतली़ वर्धा विधानसभा मतदार संघातही डॉ़ भोयर यांना भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष साथ मिळाली नसताना ४५ हजार ६५० मते घेत ८ हजार ५३० मतांनी विजय मिळविला़ एकूण वर्धा जिल्ह्यातही आयातीत उमेदवारांना मतदारांनी संधी दिली़(कार्यालय प्रतिनिधी)