सामाजिक क्षेत्रात महिलांना कर्तृत्वाची संधी
By Admin | Updated: April 24, 2015 01:58 IST2015-04-24T01:58:23+5:302015-04-24T01:58:23+5:30
महिलांनी स्वत:च्या क्षमतेला विकसित करीत प्रत्येक क्षेत्रातील वाटचाल यशस्वीरित्या कायम ठेवली आहे.

सामाजिक क्षेत्रात महिलांना कर्तृत्वाची संधी
वर्धा : महिलांनी स्वत:च्या क्षमतेला विकसित करीत प्रत्येक क्षेत्रातील वाटचाल यशस्वीरित्या कायम ठेवली आहे. सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढायला हवा, समाजातील समस्यांचा नायनाट करण्यात यामुळे सहाय्य मिळेल. कारण एक स्त्री ही घरापासून ते कार्यालयापर्यंतची जबाबदारी पार पाडत असते. या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळेच महिलांनी सामाजिक क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा विचार करायला हवा, या दिशेने सकारात्मक प्रयत्न करण्याचा आशावाद प्रतिभा अदलखिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
लॉयन्स इंटरनॅशनल क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात कार्यशील असलेल्या प्रतिभा विनोद अग्रवाल यांची नुकतीच विदर्भ प्रांताच्या उपप्रांतपालपदी निवड करण्यात आली. हे पद भुषविणाऱ्या त्या पहिल्या महिला असून पुढील चार वर्षापर्यंत त्यांच्याकडे पदभार असणार आहे. या माध्यमातून दृष्टीहिनांसाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वर्धा येथे लॉयन्स क्लबने २००७ पासून या नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी १० हजार रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते. मात्र आजही अनेक गरजूंना याची माहिती नसल्याने जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करायचे आहे. यासह मेळघाट, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात या नेत्रसेवेचा विस्तार करायचा असून त्या दिशेने कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
आजही आपल्या समाजात स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असतात. ‘बेटी-बचाओ’ या लॉयन्सच्या मोहिमेला अधिक सक्रियरित्या राबविण्याच्या दिशेने कार्य करायचे आहे. शिवाय स्वरक्षणार्थ मुलींना स्वयंसिद्धा कराटे गटातून प्रशिक्षण देणार हा प्रकल्प शाळा शाळातून राबविणार असून आठवड्यात एका शाळेची याकरिात निवड करण्यात येईल.
सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असतानाच प्रतिभा अदलखिया या संसाराची जबाबदारी तितक्याच सक्षमपणे रुग्णसेवा कायम ठेवण्यासाठी २ कोटी १३ लाखापर्यंतचा निधी संकलनाचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय अवयव दान हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविल्याचे त्यांनी सांगितले. नेत्र, किडनी हे अवयव दान केल्यास अनेकांना जीवनदान देता येईल. जागरूकतेचा अभाव असल्याने अवयव दानाविषयी आजही आपल्याकडे गैरसमजूती असल्याची खंत त्यांनी बोलवून दाखविली. जागरूकतेसाठी महिलांच्या सक्षम गटाची बांधणी करण्याचे ध्येय आहे. डॉ. विनोद अदलखिया यांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य व मार्गदर्शन यामुळे या क्षेत्रातील वाटचाल अधिक सुकर झाल्याचे त्या सांगतात. वाचनाचा छंदही त्यांनी जोपासला असून १९८८ पासून सुरू केलेली वाटचाल पुढेही याच तत्परतेने पार पाडायचा मानस त्यांनी व्यक्त केला.(स्थानिक प्रतिनिधी)