सिलिंडरचा गोरखधंदा उघड
By Admin | Updated: August 7, 2016 00:16 IST2016-08-07T00:16:15+5:302016-08-07T00:16:15+5:30
कायद्याने बंदी असताना अल्लीपूर येथील दोन इसमांकडून घरी गॅस सिलिंडरचा साठा करून त्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सिलिंडरचा गोरखधंदा उघड
अल्लीपूर येथे दोघांना अटक : २.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : कायद्याने बंदी असताना अल्लीपूर येथील दोन इसमांकडून घरी गॅस सिलिंडरचा साठा करून त्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करीत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांकडून भरलेले व रिकामे सिलिंडर तसेच त्याची वाहतूक करण्याकरिता वापरत असलेले वाहन, असा एकूण १ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी केली.
माधव ढगे रा. सदानंद वॉर्ड याला अटक करण्यात आली असून त्याचा सहकारी सागर भलमे रा. भवानी वॉर्ड हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात दोघांवर जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रानुसार, अल्लीपूर येथे राहणारे माधव ढगे व त्यांचा साथीदार गजानन उर्फ सागर भलमे हे संगणमत करून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची साठवणूक करून अवैधरित्या ग्राहकांना चढ्या दरात विकून काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे व त्यांच्या चमूने माहितीतील घरावर धाड घातली. यावेळी घरात लाल रंगाचे घरगुती वापराचे भरलेले नऊ सिलिंडर किंमत १५ हजार ३०० रुपये व सात रिकामे सिलिंडर किंमत ७ हजार रुपये असा एकूण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल परवाना नसल्याने जप्त केला. यावेळी विचारणा केली असता हे सिलिंडर गजानन उर्फ सागर भलमे याने आणले असून काही त्याच्या घरी असल्याचे कळले. यावरून त्याच्या घराची झडती घेतली असता येथे एका मालवाहु गाडीमध्ये तीन भरलेले व घरात ११ रिकामे सिलिंडर मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी सिलिंडरसह एम.एच. २९ एम १३६८ क्रमांकाचे वाहन असा एकूण २ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत माधव ढगे व सागर भलमे या दोघांवर गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पराग पोटे यांच्या नेतृत्त्वात, सहायक पोलीस उपनिरीक्षक बारवाल, जमादार नरेंद्र डहाके, दिवाकर परीमल, आनंद भस्मे, अमर लाखे, चालक भुषण पुरी, मुकेश येल्ले यांनी केली.(प्रतिनिधी)