सरपंचपद खुल्या गटासाठी, इच्छुकांचा लागणार कस
By Admin | Updated: May 13, 2015 01:55 IST2015-05-13T01:55:48+5:302015-05-13T01:55:48+5:30
स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले़ ते...

सरपंचपद खुल्या गटासाठी, इच्छुकांचा लागणार कस
रोहणा : स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले़ ते खुल्या प्रवर्गाकरिता असल्याने विविध पक्ष व गटांतील इच्छुकांचा या निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे.
गत दोन निवडणुकीत दहा वर्षांपासून ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षीत असल्याने सरपंचाच्या निवडणुकीत फारशी चुरस राहत नव्हती़ अनेकदा तर राखीव गटाचा एकच उमेदवार उपलब्ध असल्याने सक्षम असो वा नसो त्यालाच सरपंच बनवावे लागत होते़ या आरक्षणामुळे आपण सरपंच बनू शकलो नाही, अशी खंत नेहमीच अनारक्षित गटाच्या गटप्रमुख वा पक्ष प्रमुखांना सलत राहत होती़ अनेकदा आपण बनविलेला आरक्षित गटाचा सरपंच आपल्या मताप्रमाणे काम करीत नसल्याने मतभेद व खटके उडाल्याचे प्रसंगदेखील पाहापयास मिळाले आहेत. परिणामी, आर्वी तालुक्यातील एका मोठ्या राजकीय वसा प्राप्त झालेल्या गावाचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. उलट रहदारी, अतिक्रमण, रस्ते मजबुतीकरण आणि पाणी पुरवठ्यांच्या समस्यांमध्ये वाढच झाली आहे़ जून १५ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण खुल्या गटाचे आहे. यामुळे आता कोणत्याही संवर्गातील पुरूष वा महिला सरपंच बनू शकणार आहे. आरक्षणामुळे सर्वच पक्षातील गट प्रमुखांत उत्साह असून चुरस वाढली आहे. रात्रीच्या बैठका व खलबते सुरू झाली आहे़ मतदार मात्र निवडणुकीबाबत फार उदासिन असून कुणीही सरपंच झाला तरी समस्या जैसे थेच राहतात, असा समज बोलून दाखवितात़(वार्ताहर)