पीक कर्जाचे वाटप केवळ २४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:22 IST2018-07-15T22:20:57+5:302018-07-15T22:22:46+5:30
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले.

पीक कर्जाचे वाटप केवळ २४ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले. विविध बँकांचे अडेलटट्टू धोरणच प्राप्त उद्दीष्ट पूर्ण न करण्यास कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदाच्या वर्षी कासवगतीनेच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यातच पीक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची बँकेच्या अधिकाऱ्यांनी विविध कागदपत्रांसाठी अडवणूकच केल्याचे वास्तव आहे. गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्या जात नसल्याचे लक्षात येताच भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी चक्क एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या तोंडाला काळे फासून बँकांच्या मनमर्जी कारभाराचा निषेध नोंदविला. असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनांनाही अनेक बँकांनी पाठ दाखविण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी खरीपात ८५० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते; पण आतापर्यंत केवळ १६ हजार ४०७ शेतकऱ्यांना २०४ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.