आॅनलाईन परवाना अडचणीचा
By Admin | Updated: August 1, 2016 00:23 IST2016-08-01T00:23:23+5:302016-08-01T00:23:23+5:30
वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवान्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली.

आॅनलाईन परवाना अडचणीचा
गौरव देशमुख वर्धा
वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवान्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. पद्धत सोपी आणि पारदर्शक करण्याकरिता राबविण्यात येत असलेली ही परीक्षा मात्र डोकेदुखीची व आर्थिक नुकसानीची ठरत असल्याची ओरड होत आहे. परीक्षेकरिता खासगी संगणक केंद्रात गेल्यास या नोंदणीकरिता वाहन चालकाला ३१ रुपयाच्या परवान्यासाठी तब्बल १०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.
वाहन चालविण्याच्या परवान्याकरिता आॅनलाईन परीक्षा सुरू झाली. याला सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात एकूण ६६ हजार ११० जणांनी आॅनलाईन परीक्षा दिली; परंतु या परीक्षेबाबत कुठलेही मार्गदर्शन व माहिती मिळत नाही. यामुळे या काळात केवळ ३६ हजार ८०७ चालक परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांनाच परवाना मिळाला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
दुचाकी चालकाच्या शिकाऊ परवान्यासाठी १ जानेवारी २०१३ ते ३० जून २०१६ पर्यंत ६६ हजार ११० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यात ७०९ उमेदवार गैरहजर राहिले. यातील काहींनी आवश्यक शुल्क भरले. दुचाकीच्या शिकाऊ परवान्यासाठी गत ३ वर्षांपासून आॅनलाईन अपॉईटमेंट घ्यावी लागते. यामुळे वेळेची बचत होते. शिवाय सहज पद्धतीने हा परवाना मिळणार असल्याने वाहन चालकांचीही सोय होते. हाच उद्देश समोर ठेवत तीन वर्षांपासून शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. आॅनलाईन परीक्षा सर्वसामान्यांना सोयीची असावी व ती सहज पद्धतीने देता यावी हे अभिप्रेत आहे. त्यानुसार इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही संगणकावरून किंवा स्मार्ट फोनवरूनही अपॉईटमेंट घेता येते; परंतु आॅनलाईन परीक्षेबाबत कुठल्याच प्रकारची माहिती परीक्षेला बसण्याअगोदर देण्यात येत नसल्याने उमेदवारांसमोर अडचण निर्माण होते. दरम्यान उमेदवारांना आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वेळेवर उपप्रादेशिक कार्यालयात येऊन आॅनलाईन परीक्षा द्यावी लागते. या आॅनलाईन चिन्हाबाबत उमेदवारांना कोणतीही माहिती नसल्यामुळे अनेकजण या परीक्षेत नापास होत आहेत.
यामुळे पुन्हा वेळ घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी चांगलीच अडचणींची ठरत आहे. यातून उमेदवारांना वाहतुकीच्या नियमांचे कितपत आकलन आहे, हे तपासले जाते. हे एका दृष्टीने चांगले असले तरीही परीक्षा कशी होणार आहे. याची माहिती नसल्याने उमेदवारांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिकाऊ उमेदवारांची ही अडचण लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती पत्रकाचे वाटप झाल्यास उमेदवारांना परीक्षा देताना फायदा होऊ शकतो.