आॅनलाईन दस्तावेज नोंदणीला प्राधान्य
By Admin | Updated: December 20, 2014 02:00 IST2014-12-20T02:00:02+5:302014-12-20T02:00:02+5:30
सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी यांनी इ-प्रशासनाच्या कामांचा वेग वाढून आॅनलाईन दस्ताऐवज नोंदणीवर अधिक भर द्यावा, ..

आॅनलाईन दस्तावेज नोंदणीला प्राधान्य
वर्धा : सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी यांनी इ-प्रशासनाच्या कामांचा वेग वाढून आॅनलाईन दस्ताऐवज नोंदणीवर अधिक भर द्यावा, अशा सूचना प्रशासनाला जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख चंद्रकांत दळवी यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी इ-कामकाजाबाबत दळवी यांनी चर्चा केली. तसेच जिल्ह्याच्या संपूर्ण प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्यात. प्रत्येक तालुकापातळीवर नियोजनबद्धपणे इ-प्रशासनाच्या कामांत गती देऊन आॅनलाईन दस्ताऐवजांच्या नोंदी, स्कॅनिंग आदी कामांना प्राधान्य द्यावे, तसेच मुद्रित केलेला संगणकीकृत डाटा लवकरात लवकर अपलोड करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीला भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे, निवासी उपजिल्हाअधिकारी सुनील गाढे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार राहुल सारंग, सेलू तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, समुद्रपूर येथील तहसीलदार कुमरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भगवान सूर्यवंशी, उपअधीक्षक भूमी अभिलेख ए.आर. फुलझले, जी.सी. खिची, यू.एम. झेंडे, पी.बी. कराड आदी उपस्थित होते़
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी दवळी यांचा सत्कार तर सूर्यवंशी यांनी काळे यांचा सत्कार केला़ बैठकीची सांगता गाढे यांनी आभार मानून केली.(शहर प्रतिनिधी)
ई-गव्हर्नन्स
शासनाने ई-गव्हर्नन्सवर भर दिला आहे़ संपूर्ण रेकॉर्ड आॅनलाईन करण्याची मोहीम राज्यस्तरावर राबविली जात आहेत़ यासाठी संपूर्ण कार्यालयांचे रेकॉर्ड आॅनलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तालुकासतरावर नियोजनबद्धपणे ई-प्रशासनाच्या कामांना गती देत आॅनलाईन दस्ताऐवजांच्या नोंदी, स्कॅनिंग आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येत आहे़ मुद्रित संगणकीकृत डाटाही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्यात़