आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याला तिलांजली

By Admin | Updated: November 6, 2014 02:13 IST2014-11-06T02:13:02+5:302014-11-06T02:13:02+5:30

इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आॅन-लाईन आवेदनपत्रे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून ...

The online application form has to be filled | आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याला तिलांजली

आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याला तिलांजली

वर्धा : इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आॅन-लाईन आवेदनपत्रे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून भरण्याच्या आदेशाकडे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी पालकांना नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतला आहे. शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शिक्षक समितीच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे आॅनलाईन भरण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या आणि नगर पालिकांच्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने आॅनलाईन आवेदनपत्रे कार्यालयामार्फत भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ३० आॅक्टोबर २०१४ ला आदेश काढून जिल्हा परिषदेच्या व नगर पालिकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावरून आॅनलाईन भरावीत आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या. मात्र कामाची जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागाने सदर सूचना प्राथमिक शाळांना कळविल्या नाही.
उलट मुख्याध्यापक-शिक्षकांनी आपल्या स्तरावरून परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आॅन-लाईन फॉर्म तात्काळ भरण्याचा तगादा लावला आहे. आॅनलाईन आवेदनपत्रे निशुल्क भरण्याच्या आदेशाकडे पं.स.च्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे इंटरनेट सुविधेसाठी पालकांना, मुख्याध्यापक-शिक्षकांना नाहक भुर्दंड बसत आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिखक समितीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर केले असून, पंचायत समिती स्तरावरून आवेदनपत्रे, निशुल्क भरण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
सोबतच जि.प. च्या सेस-निधीतून ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरले जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही कोणत्या पद्धतीने करावी, याचेही निर्देश निर्गत करण्याची मागणी समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर, भुते, प्रकाश काळे, बोबडे, बाराहाते, भोकरे, ताटेवार, कावळे आदींनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: The online application form has to be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.