एक रेतीघाट जाणार दीड कोटीमध्ये
By Admin | Updated: November 24, 2014 23:02 IST2014-11-24T23:02:43+5:302014-11-24T23:02:43+5:30
गतवर्षी तालुक्यातील सात रेतीघाटांचा लिलाव सात कोटी रुपयांमध्ये झाला. रेतीघाट लिलाव घेणाऱ्यांनी पोकलॅँड, बोटीच्या साह्याने अक्षरश: माती लागेपर्यंत बेसुमार रेतीचा उपसा केला.

एक रेतीघाट जाणार दीड कोटीमध्ये
आष्टी (श़) : गतवर्षी तालुक्यातील सात रेतीघाटांचा लिलाव सात कोटी रुपयांमध्ये झाला. रेतीघाट लिलाव घेणाऱ्यांनी पोकलॅँड, बोटीच्या साह्याने अक्षरश: माती लागेपर्यंत बेसुमार रेतीचा उपसा केला. शासनाला दिलेल्या रकमेच्या चौपट रक्कम वसूल करून माफिया गब्बर बनले़ आता यावर्षी नदीपात्रात रेतीचा लिलाव करण्यासाठी साठाच शिल्लक नाही. काही घाटात शिल्लक असलेल्या रेतीसाठ्याची विनारॉयल्टी चोरीच्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. यात महसूल यंत्रणेतील काही बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचे बोलले जाते.
तालुक्यात भिष्णूर, भारसवाडा, गोदावरी, खंबीत, अंतोरा, वाघोली, सिरसोली, ईस्माइलपूर, नबाबपूर, मिर्झापूर असे एकूण १० रेतीघाट आहेत़ अपूरा पाऊस झाल्याने नदीला पूर गेला नाही. यातच मागील वर्षीच्या बेसुमार उपशामुळे घाटातील पात्र २० ते २५ मीटर खोलवर खोदून काढले आहे. शासनाचे नियम पायदळी तुडविले आहे. रॉयल्टी बुक नकली व बनावट छापून त्याआधारे रेतीची भरमसाठ तस्करी करण्यात आली़ त्याचा परिणाम यावर्षी भोगावा लागणार आहे. नदीच्या काठावरील गावांना या बेसुमार उपशामुळे धोका निर्माण झाला आहे. ३० सप्टेंबर २०१४ रोजी रेती घाटाची मुदत संपल्यावर नवीन लिलाव व्हायला हवा होता; पण तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी व जिल्हा गौणखनीज अधिकारी कार्यालयास उशीरा माहिती पाठविली. यामुळे लिलावाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही.
सद्यस्थितीत शासकीय तथा खासगी कामे सुरू आहेत़ या कामांसाठी रेती उपलब्ध नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून मध्यप्रदेशातील छिंदवाडा, नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथून रेती विकत घ्यावी लागत आहे. महागडी रेती परवडणारी नसल्यामुळे कामे ठप्प झाली आहेत़ याचाच फायदा उचलत काही रेतीमाफियांनी रात्रीला चोरट्या मार्गाने रेती चोरून विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. या मोबदल्यात संपूर्ण यंत्रणेपर्यंत चिरीमिरी पोहोचत असल्याचे दिसते़ तालुक्यात एकाने चोरट्या मार्गाने रेती विकण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू केला आहे. यामुळे चोरीची रेती माफियांना फायद्याची असली तरी शासनाला चुना लावणारी ठरत असल्याचे दिसते़ उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने त्यांचाच तर आशीर्वाद या रेती माफियाला नाही ना, असा संशयही नागरिक व्यक्त करीत आहेत़(प्रतिनिधी)