वारसांना १० लाख अर्थसहाय्य द्यावे
By Admin | Updated: September 7, 2014 00:05 IST2014-09-07T00:05:15+5:302014-09-07T00:05:15+5:30
साप या प्राण्याचा वन्यजीव कायद्याप्रमाणे वन्यजीव सुचित समावेश होतो. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांच्या वारसास १० लाख रुपये तर सर्पदंश झाल्यावर त्वरित उपचारासाठी ५० हजार रुपये शासनाने द्यावे,

वारसांना १० लाख अर्थसहाय्य द्यावे
जिहाधिकाऱ्यांना निवेदन : सर्पदंशाने मृत पावलेल्यांच्या
वर्धा : साप या प्राण्याचा वन्यजीव कायद्याप्रमाणे वन्यजीव सुचित समावेश होतो. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांच्या वारसास १० लाख रुपये तर सर्पदंश झाल्यावर त्वरित उपचारासाठी ५० हजार रुपये शासनाने द्यावे, अशी मागणी विदर्भ सर्प मित्र मंडळाचे संस्थापक गजेंद्र सुरकार यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह वनमंत्री, पालकमंत्री यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधींना केली. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार विदर्भ सर्पमित्र मंडळाने गत १० वर्षापासून या विषयांच्या अनुषंगाने वेळो-वेळी संबंधित सर्व खात्याचे मंत्री विरोधी पक्ष नेते संबंधित खात्याचे अधिकारी यांना निवेदने, भेटी दिल्या. मात्र अतिशय महत्त्वाच्या या विषयावर अद्यापही निर्णय घेतल्या गेलेला नाही. सर्पदंशाने मरण पावणारे अधिकांश नागरिक गरीब असतात. लवकरात लवकर हा निर्णय न घेतल्यास विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने तीव्र लढा उभारण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सापाने गरीब शेतकरी, शेतमजूर यांना दंश केल्यावर त्यांच्या घरचा कर्ता माणूस जातो. उपचारासाठी मोठी खर्च येतो. कधी-कधी बैल, दुधाळू गाय, म्हैस यांना दंश केल्यावर त्यांचाही मृत्यू होतो. त्यामुळेही शेतकरी कर्जबाजारी होतो. अनेकदा शासन अपघातात मरण पावलेल्या लोकांना मदत देते. उपचारासाठी मदत करते. इतर वन्यजीवाने हल्ला केल्यास शेतीचे नुकसान केल्यासही शासनाद्वारे काही ना काही मदत केली जाते. मात्र सर्पदंशाने मृत्यू झाल्यास, उपचारासाठी खर्च झाल्यास, जनावरे सर्पदंशाने मरण पावल्यास कुठलीही मदत केली जात नाही. त्यामुळे निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी हा निर्णय घेतला अशी मागणी निवेदनात यावेळी करण्यात आली.
शेतकरी तसेच शेतमजुरांची स्थिती ही चांगली नाही. शेतात काम करीत असतानाच सर्पदंश होऊन मरण पावलेल्यांची संख्या ही जास्त आहे. तसेच अनेक रुग्णालयांमध्ये यावरील उपाय म्हणून वापरले जात असलेले प्रतिवीष उपलब्ध नाही. तसेच ते महागही आहे. त्यामुळे लवकर रुग्णालयात दाखल करूनही रुग्ण दगावतात. या कारणाने ही मागणी केली जात आहे.
यावेळी शिष्टमंडळात अ.भा. जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा प्रभा घंगारे, प्रजासत्ताक शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, संयुक्त कामगार आघाडीचे जिल्हा सचिव नंदकुमार वानखेडे, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार, सद्भावना नागरिक मंचचे जिल्हा अध्यक्ष आय. एच. मुल्ला, समता शिक्षक संघाचे गौतम पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी इथापे, राष्ट्रसेवादलाचे संघटक शिवम घाटे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या अध्यक्षा नुतन माळवी, जिल्हा नशाबंदी मंडळाचे मयुर राऊत, नॅशनल बुद्धीष्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र कांबळे, नागरिकमंचचे प्रभाकर घारे, यांच्यासह, श्रेया गोडे, मयुर डफळे, कुंदलता घंगारे, प्रा. श्रीराम मेंढे आदी सहभागी होते.(शहर प्रतिनिधी)