दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर
By Admin | Updated: August 26, 2016 02:02 IST2016-08-26T02:02:22+5:302016-08-26T02:02:22+5:30
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर चिचघाट पाटीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला मागाहून धडक दिली.

दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर
चिचघाट पाटीजवळील घटना
हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर चिचघाट पाटीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला मागाहून धडक दिली. गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले.
निलेश चिंतामण शंभरकर (३०) रा. शिवसेना वसाहत असे मृतकाचे नाव आहे. तर आशिष वसंत चनेकार (२२) रा. सावंगी (झाडे) व ट्रक चालक बंटी रेड्डी हे दोघे जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश शंभरकर व आशिष चनेकार हे दोघे एमएच ४० एजे १९३२ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट कडे जात होते. दरम्यान चिचघाटनजीक त्यांच्या दुचाकीला टीएन ५२ एच ५७४७ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. याच वेळी ट्रकच्या मागे असलेला दुसरा एपी २१ टीडब्लू ३४५६ क्रमांकाचा ट्रक अपघात झालेल्या ट्रकवर आदळला. या अपघातात दुचाकी चालक निलेश शंभरकर याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला आशिष चनेकार हा जखमी झाला. या अपघातग्रस्त ट्रकवर आदळलेल्या ट्रकचा चालक बंटी रेड्डी वय ३० रा.कन्नोर, आंध्रप्रदेश हा सुद्धा जखमी झाला. दोन्ही जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून जमादार रूपचंद भगत, शिपाई शेखर नेहारे करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)