बस अपघातात वृध्द महिला ठार
By Admin | Updated: December 11, 2015 02:39 IST2015-12-11T02:39:41+5:302015-12-11T02:39:41+5:30
येथील बसस्थानकावरील धावपळीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील ७५ वर्षीय महिला अचानक बसखाली येवून चिरडल्या गेली.

बस अपघातात वृध्द महिला ठार
देवळी बसस्थानक परिसरातील घटना
देवळी : येथील बसस्थानकावरील धावपळीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील ७५ वर्षीय महिला अचानक बसखाली येवून चिरडल्या गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २.४५ वाजताच्या दरम्यान घडली. कलावती रामकृष्ण मारोटकर असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावच्या तीन महिला भिक्षा मागण्यांसाठी म्हणून सोनेगाव (आबाजी) येथील यात्रेत आल्या होत्या. या परिसरात भिक्षा मागण्याची त्यांची ही पहिली वेळ होती. यात्रेत एक दिवसाचा मुक्काम करून त्या परतीच्या प्रवासासाठी देवळीच्या स्थानकावर आल्या. याच दरम्यान उदगीर-नागपूर बस क्र. एमएच ४०, वाय ५८७१ ही गाडी स्थानकावर येवून उभी राहिली. पुढील प्रवासासाठी चालकाने ही गाडी सुरू करताच बस पकडण्याच्या लगबगीमध्ये यातील कलावती रामकृष्ण मारोटकर अचानक बसपुढे आली. यात ती चिरडल्या गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. या बसस्थानकावर जागेचा अभाव असल्यामुळे नेहमीच अपघाताचे प्रसंग उदभवत आहे. स्थानकावर रात्रीचे वेळेस कोणतीच व्यवस्था राहत नसल्यामुळे तसेच प्रशासन याबाबत गंभीर नसल्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी चालक आर. वाटरखेडे याला अटक केली.(प्रतिनिधी)
कारच्या धडकेत महिला जखमी
वर्धा - रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत महिला गंभीररित्या जखमी झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रं. ७ वरील संताराम हॉटेल परिसरात ही घटना मंगळवारी घडली. शांताबाई आत्राम असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत नत्थूजी बेटी रा. जाम यांनी समुद्रपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. सदर महिला रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या एम.एच.३४ ए.एम. ५१३१ क्रमांकाच्या कार चालकाने धडक दिली. यानंतर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी कार चालकावर भादंविच्या कलम २७९, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.