जुने रस्ते उखडले; नव्या रस्त्यांचे स्वप्न भंगले
By Admin | Updated: November 14, 2015 02:21 IST2015-11-14T02:21:07+5:302015-11-14T02:21:07+5:30
गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली.

जुने रस्ते उखडले; नव्या रस्त्यांचे स्वप्न भंगले
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कोलमडली : निधी देण्याकरिता शासनाकडून टाळाटाळ
आष्टी (शहीद) : गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली. त्यांच्या योजनेने गावे शहराशी जोडली गेली. प्रत्येक गावात पक्का रस्ता गेला. दळणवळण सोयीचे झाले. नागरिकांकरिता महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत कालांतराने निधी कमी होवू लागल्याने नियोजन कोलमडले आहे. सध्यस्थितीत केंद्राकडून झालेल्या कामांचे पैसे सुद्धा मिळत नसल्याने योजनेच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गत वर्षभरापासून एकही नवीन काम मंजूर झाले नाही. राज्यातून ठराव गेले; मात्र केंद्राने निधी देण्यास हात वर केले. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते निर्माणाच्या प्रतीक्षेत आहेत. गावकऱ्यांना खडतर मार्गातून वाट काढावी लागत आहे. आष्टी तालुक्यात मोई-माणिकवाडा, गोदावरी, टेकोडा, आष्टी, किन्हाळा, लहानआर्वी, लिंगापूर, वाडेगाव, कोल्हाकाळी, मोई, मुबारकपूर, थार, बोरखेडी या रस्त्यांची लांबी व कामाचा दर्जा पाहता मोठी तरतूद आवश्यक आहे. मात्र अद्यापही निधी प्राप्त झाला नाही. खासदार रामदास तडस यांनी जिल्ह्याचे नियोजन करून केंद्राकडे पाठविले आहे. सन २०१४-१५ मध्ये एकही काम मंजूर झाले नसल्याची माहिती आहे. निधीच नाही तर नवीन कामे येणार तरी कसे हा मोठा प्रश्न आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात भरमसाठ निधीमुळे चांगल्या प्रोव्हीजन घेता येतात. त्यामुळे सदर रस्ते चिरकाल टिकून राहते नागरिकांनाही ही योजना पसंत आली होती. केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून योजना ही पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. या योजनेमधून सुजातपूर, भारसवाडा, भिष्णूर रस्त्याचे काम १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले. यातील ५ कोटी ४० लक्ष रुपये अद्याप आले नाही. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले आहेत. यासाठी दिल्ली येथे झालेल्या मोर्चा, निदर्शनामध्ये राज्यातील सर्व कंत्राटदार हजर होते. त्याचाही काहीच फायदा झाला नाही. एकूणच शासन चांगली योजना गुंडाळून ठेवण्याच्या मार्गावर दिसते. या धर्तीवर मुख्यमंत्री रस्ते योजना कार्यान्वित होणार असल्याचे या विभागाच्या कार्यालयात बोलले जात आहे. या संदर्भात मात्र कुठलीही ठोस माहिती नाही.(प्रतिनिधी)