Officers changed, nameplates remain! | अधिकारी बदलले, नावाच्या पाट्या कायम!

अधिकारी बदलले, नावाच्या पाट्या कायम!

ठळक मुद्देशासकीय निवासस्थाने : सुरक्षाही वाऱ्यावर; सार्वजनिक बांधकाम विभाग घेतोय डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची लोकमत चमूने पाहणी करीत तेथील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक निवासस्थानांवर अधिकारी बदलून गेल्यावर नावाच्या पाटया कायम दिसून आल्या. तर अनेक निवासस्थाने मोकडळीस आलेली दिसून आली. यावरून यंत्रणेची अनास्था आणि डोळेझाकपणाच ऐरणीवर आला आहे.
उच्चपदस्थ अधिकारी बदलून फार मोठा काळ लोटूनही शहरातील मोडकळीस आलेल्या शासकीय निवासस्थानांवर त्यांच्या नावाच्या पाटया कायम असल्याने संबंधित अधिकारी आणि यंत्रणा डुलक्या घेत असल्याचा प्रत्यय येत आहे.
सिव्हिल लाइन परिसर, नागपूर मार्गालगत बहुतांश उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. याच निवासस्थानात राज्याच्या इतर भागातून बदलून आलेले अधिकारी वास्तव्याला असतात. यातील बहुतांश निवासस्थाने आजघडीला मोडकळीस आलेली असल्याचे चित्र आहे. नागपूर मार्गालगत आरती चित्रपटगृह चौकातील उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या निवासस्थानाची दैनावस्था झालेली असून निवासस्थानाला गाजरगवत आणि जंगली झुडपे आणि वेलींनी विळखा घातला असल्याचे चित्र आहे. या निवासस्थानात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले वास्तव्याला होते. ते बदलून जाण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लोटला; मात्र, निवासस्थानावर त्यांच्या नावाची पाटी कायम आहे. पडिले यांचे स्थानांतरण झाल्यापासून येथे कुणीही वास्तव्याला नाही. विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप असून त्यांचे पोलीस विभागाच्या वसाहतीत वास्तव्य असल्याची माहिती आहे. अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांचेही वर्षभरापूर्वी स्थानांतरण झाले. मात्र, त्यांच्या ‘हिमालय’ या निवासस्थानावर नावाची पाटी कायम आहे. देखभालीअभावी या निवासस्थानातही जंगली झाडे वाढली असून सद्यस्थितीत बंद आहे. अपर जिल्हाधिकारी म्हणून अशोक लटारे आहेत. निवासस्थानाची दुर्दशा असल्याने की काय, त्यांचे जिल्हा संकुलाशेजारी असलेल्या शासकीय निवासस्थानात वास्तव्य आहे. याशिवाय अनेक शासकीय निवासस्थाने बेवारस अवस्थेत असून प्रवेशद्वारेही उघडीच आहेत.
शासकीय निवासस्थानांची दुर्दशा पाहता पाठपुरावा करण्याबाबत वास्तव्य करणारे अधिकारीही कायम उदासीनता बाळगून असल्याचे दिसून येते. या सर्वच निवासस्थानांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. हा विभागही झोपा काढत असल्याचे चित्र आहे. अनेक निवासस्थानांचे छतही तुटलेले असून प्रवेशद्वार, निवासस्थानाची दारे, खिडक्या, तावदानाची दुर्दशा झालेली आहे. सह्याद्री या निवासस्थानाचे दार उघडेच असून नावाची पाटीच बेपत्ता झाली आहे. शासकीय निवासस्थाने अशीच बेवारस आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत राहिली तर सुरक्षा आणि देखभालीअभावी असामाजिक प्रवृत्तीकरिता आश्रयस्थाने ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

एसपींच्या बंगल्यावरील बदलेल काय पाटी?
डॉ. बसवराज तेली यांची बदली झाल्याने त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. पोलीस अधीक्षक म्हणून मंगळवारी प्रशांत होळकर यांनी कार्यभार स्वीकारला.
मात्र, पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानावर अद्याप डॉ. बसवराज तेली यांच्या नावाची पाटी कायम आहे. ही पाटी तातडीने बदलण्याचे सौजन्य तरी सार्वजनिक बांधकाम विभाग दाखवेल का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.

निवासस्थानांना जंगली झुडपांचा विळखा
अनेक निवासस्थाने बेवारस अवस्थेत असून कुणी वास्तव्यालाच नसल्याने निवासस्थानाला सद्यस्थितीत जंगली झाडे-झुडपांनी वेढा घातला असतानाच आवारात झुडपांचे मोठे पीक आले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. देखभाल, दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. यामुळे भविष्यात ही निवासस्थाने खंडर होण्याच्या मार्गावर आहेत.

रस्ता उंच, निवासस्थाने गेलीत खाली
दूरसंचार कार्यालय मार्गावर काही शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या मार्गाचे एक-दीड वर्षापूर्वी मजबुतीकरण करण्यात आले. आज रस्ते उंच झाले असून निवासस्थाने खाली गेली आहेत.
त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी निवासस्थानांच्या आवारात साचते. यामुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाच प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Officers changed, nameplates remain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.