नागरिकांच्या सुविधेकरिता बदलली कार्यालयीन वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:09 IST2018-02-07T00:05:37+5:302018-02-07T00:09:00+5:30

Office time changed for convenience of citizens | नागरिकांच्या सुविधेकरिता बदलली कार्यालयीन वेळ

नागरिकांच्या सुविधेकरिता बदलली कार्यालयीन वेळ

ठळक मुद्दे पिपरी (मेघे) ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली : सकाळी ८ वाजता सुरू होणार कार्यालय

ऑनलाईन लोकमत
वर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. एवढ्या सकाळी काम सुरू होणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.
शासकीय कामकाजाची वेळ सकाळी १० वाजताची आहे. या वेळत काम सुरू होईल हे सांगणेही तसे कठीणच. शासकीय कार्यालयात याचा प्रत्यय अनेकवार नागरिकांना आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर तर ग्रामसचिव बाहेर गावातून येणारेच आहेत. दिलेल्या वेळेत काम सुरू होणे अशक्यच आहे. यामुळे एका कामाकरिता नागरिकांना पूर्ण दिवसच वाया घालवावा लागतो. याची दखल घेत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या परवानगीने थेट कामाची वेळ बदलवून टाकली आहे.
पिपरी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या सचिवालाही या वेळेत कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सकाळी ८ वाजता गेलेल्या व्यक्तीला त्याच्या कामाकरिता दुपारी येण्याची वेळ लागणार नाही. तात्काळ मिळणारे कागदपत्र त्याला त्याच वेळी मिळेल, अशी सुविधा करण्यात आली आहे. सकाळपासून सुरू झालेले काम दुपारी १ वाजता संपत आहे. यांनतर दुपारी ३ वाजता पुन्हा काम सुरू होते. दुपारी १ ते ३ या काळात आलेली कागदपत्रे कर्मचाऱ्यांमार्फत स्वीकारण्यात येत असून नागरिकांना आवश्यक कागदपत्र तात्काळ देण्यात येत आहे.
दोन शनिवार पूर्णवेळ
शासनाच्या नियमानुसार दोन शनिवार रजेचे असल्याने ते सोडून दोन शनिवारी याच काळात काम सुरू होणार आहे. या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीला आवश्यक कागदपत्र मिळाले नसल्यास त्यांना सरपंचाकडे तक्रार करण्याची मुभा आहे.

एका साध्या रहिवाशी प्रमाणपत्राकरिता नागरिकांना दिवस वाया घालवावा लागत असल्याचे दिसून आले. या भागात सरकारी नोकरी पेशा नागरिक आहेत. त्यांना छोट्याशा कामाकरिता दिवस घालवावा लागत होता. यामुळे कामकाजाची वेळ बदलविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. तसा ठराव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. नागरिकांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.
- अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे)

Web Title: Office time changed for convenience of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.