कार्यालय वाऱ्यावर टाकून कर्मचारी लग्नाला
By Admin | Updated: December 17, 2015 02:09 IST2015-12-17T02:09:34+5:302015-12-17T02:09:34+5:30
पाटबंधारे विभागाच्या वर्धा परिसरातील तीनही कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयाला काही वेळेपर्यंत दांडी मारून लग्न सोहळ्याकरिता गेले होते.

कार्यालय वाऱ्यावर टाकून कर्मचारी लग्नाला
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील प्रकार : पंखे, लाईट, संगणक सुरूच होते
वर्धा : पाटबंधारे विभागाच्या वर्धा परिसरातील तीनही कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयाला काही वेळेपर्यंत दांडी मारून लग्न सोहळ्याकरिता गेले होते. बुधवारी सकाळी कार्यालयात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खुर्ची, टेबलवर बॅग व हेल्मेट ठेवून विवाहस्थळाकडे धाव घेतली. मात्र कार्यालयातील विद्युत उपकरणे बंद करण्याचाही त्यांना विसर पडला. दुपारपर्यंत विद्युत उपकरणे सुरूच असल्याने विजेचा अपव्यय होत होता. शिवाय कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागली.
गावावरुन आलेल्या शेतकऱ्यांना कार्यालयात शिपाई आणि लिपीक वगळता एकही कर्मचारी दिसला नाही. त्यामुळे तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न पडला. कार्यालय वाऱ्यावर सोडून कर्मचारी दुपारपर्यंत समारंभात व्यस्त असल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्धा, लघु सिंचन विभाग कार्यालय, पिपरी (मेघे) येथील निम्न वर्धा कालवे कार्यालय तसेच वर्धा येथील निम्न वर्धा कार्यकारी अभियंता कार्यालय व धाम उन्नई धरण उपविभाग कार्यालय अशा तिनही कार्यालयात हा प्रकार पहावयास मिळाला. एका विवाह सोहळ्याला पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. याकरिता वरिष्ठांची परवानगी घेतल्याचे कर्मचारी सांगतात. मात्र एकाचवेळी सर्व कर्मचाऱ्यांना परवानगी कशी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयातील लेखा, आस्थापना, आवक-जावक, दस्तऐवज, तांत्रिक विभाग, झेरॉक्स कक्ष, संगणक शाखा, महसूल शाखा, रेखा विभाग, उपविभागीय अधिकारी येथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. लघु सिंचन विभाग कार्यालयात तर शिपाई नव्हता. मुख्य कार्यालय दुपारपर्यंत शिपाई आणि लिपीकाने राखले. यात नागरिकांची नाहक ताटकळ झाली. वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेत या कर्मचाऱ्यांवर कोणती कार्यवाही करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
शिपायाने कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती मला दिली होती. आस्थापनातले कर्मचारी माझी परवानगी घेवून लग्न कार्याकरिता गेले होते. मात्र ते काही वेळातच परतले. इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कुणाची परवानगी घेतली याची माहिती मला नाही. तांत्रिक विभाग, लेखा विभागातील कर्मचारी एकाच वेळी समारंभाला गेले नसावे.
एस.जी. ढवळे, कार्र्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,वर्धा
सकाळी ११ वाजता कार्यालयात आलो त्यावेळी कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हते. शेतातून कालवा गेला असल्याने त्याचे संमत्तीपत्र व काही कागदपत्र देण्यासाठी मी या कार्यालयात आलो होतो. परंतु सगळे कर्मचारी लग्नाला गेल्याचे कळले.
- गोविंद बळीराम डहाके, गिरोली.
मी गत एक ते सव्वा तासापासून कार्यालयात बसून आो, अद्याप कोणीच आलेले नाही. सगळे अधिकारी लग्नाला गेल्याचे समजल्याने मी कार्यालयाबाहेर बसलो.
- प्रशांत झाडे, भिडी, ता. देवळी.
निम्न वर्धा प्रकल्पात माझे शेत गेल्याने मला काही कागदपत्र येथे द्यायचे होते. ते देण्यासाठी मी अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रतीक्षा करीत आहे. दिड तासापासून येथे एकही जण फिरकलेला नाही.
- विजय मधुकर धरणे, वाबगाव, ता. देवळी
कार्यालयात विजेचा अपव्यय
एकीकडे शेतकऱ्यांना पिकांना ओलीत करण्यासाठी वीज मिळत नाही तर दुसरीकडे शासकीय कार्यालयात लाईट, पंखे, संगणक सुरू ठेऊन कर्मचारी बाहेर जातात. यामुळे विजेचा अपव्यय होतो.
विजेचा अपव्यय टाळावा याकरिता शासकीय स्तरावर नागरिकांमध्ये जागृती केली जाते. मात्र शासकीय कर्मचारीच याचा अवलंब करीत नसल्याची बाब आजच्या घटनेतून उघड झाली आहे. संबंधीत विभागाने याची दखल घेत कर्मचाऱ्यांना विजेचा अपव्यय टाळण्याच्या सूचना देणे गरजेचे ठरत आहे.
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी बेपत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पाटबंधारे विभागाचे कार्यालय असून आस्थापना विभाग, लेखा शाखा, दस्तऐवज विभाग या विभागात कर्मचारी नव्हता. टेबल आणि खुर्च्या रिकाम्या होत्या. यावेळेत कामानिनित्त आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. केवळ कर्मचारी वर्गाच्या बॅग व कागदपत्रे, फाईल्स वगळता अन्य कुणीही नव्हते. आर्वी रोडवरील पिपरी (मेघे) परिसरातील दोन्ही कार्यालयात दुपारपर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. येथे आलेले शेतकरी कर्मचारी येईपर्यंत प्रतीक्षा करीत होते.
शेतकऱ्यांना करावी लागली प्रतीक्षा
निम्न वर्धा प्रकल्पात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहे. याचा अद्याप त्यांना मोबदला मिळाला नसल्याने सतत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पण त्यांना न्याय मिळालेला नाही. पिपरी येथील निम्न वर्धा कालवे कार्यालयात आलेल्या शेतकरी बांधवांना दुपारपर्यंत अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागली. कार्यालय परिसरात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने विचारणा तरी कुणाला करावी असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला. सकाळपासून या शेतकऱ्यांची ताटकळ झाली.
दुपारपर्यंत तीनही कार्यालयात शुकशुकाट
डॉ. आंबेडकर चौक परिसरात असलेल्या लघु सिंचन विभाग कार्यालयात एकूण ३३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती संबंधितांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता ढवळे हे कार्यालयात उपस्थित होते. लेखा, आस्थापना, आवक-जावक, दस्तऐवज, तांत्रिक विभाग, झेरॉक्स कक्ष, संगणक शाखा, महसूल शाखा, रेखा विभाग, उपविभागीय अधिकारी या सर्व विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खुर्च्या त्यांची वाट बघत होत्या. हाच प्रकार पिपरी येथील निम्न वर्धा कालवे विभाग कार्यालयातील पाहायला मिळाला. येथे जवळपास ३० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी दोन जण दौऱ्यावर होते तर एक लिपीक व शिपाई कार्यालयात उपस्थित होते. निम्न वर्धा कार्यकारी अभियंता कार्यालय आणि धाम उन्नई धरण उपविभाग येथीलही अधिकारी बेपत्ता होते. दुपारी दोन वाजेपर्यंत या तीनही कार्यालयातही हिच परिस्थिती असल्याने कार्यालयात शुकशुकाट होता.