नर्सिंगची शिष्यवृत्ती रद्द; बंदला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: December 8, 2014 22:38 IST2014-12-08T22:38:43+5:302014-12-08T22:38:43+5:30

नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येत होती; पण राज्य शासनाने ती बंद करण्याचा फतवा काढला़ यामुळे राज्यातील इमाव, अनु़ जाती, जमाती प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थिनींचे

Nursing scholarship canceled; Bandla composite response | नर्सिंगची शिष्यवृत्ती रद्द; बंदला संमिश्र प्रतिसाद

नर्सिंगची शिष्यवृत्ती रद्द; बंदला संमिश्र प्रतिसाद

वर्धा : नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येत होती; पण राज्य शासनाने ती बंद करण्याचा फतवा काढला़ यामुळे राज्यातील इमाव, अनु़ जाती, जमाती प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे़ यामुळे असंतोष पसरला आहे़ हा अन्यायकारक आदेश रद्द करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सोमवारी (दि़८) नर्सिंग विद्यालये, शाळा, महाविद्यालयांचा बंद पाळण्यात आला़ या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़
निर्सिंगच्या शिष्यवृत्ती बंदच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला़ सोमवारी शहरातील नर्सिंग विद्यालये तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले़ यावेळी विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती कायम ठेवण्याची मागणी लावून धरत तत्सम घोषणा दिल्या़
नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना राज्य शासन शिष्यवृत्ती देत होते. यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेऊन नोकरीस पात्र ठरत होत्या. दुर्बल घटकातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याकरिता शासनाला दरवर्षी ८९ कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती; पण राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर केवळ उद्योगपती व व्यापाऱ्यांचे हित साध्य करण्यासाठी चुकीची धोरणे राबविली जात आहे़ यात सर्वसामान्य समाज घटकांतील नागरिकांवर अन्याय केला जातो़ ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यभर उभारलेल्या आंदोलनास सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले होते. आघाडी शासनाच्या नाकर्तेपणावर तोफ डागली होती; पण आता ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती बंद करून भाजप शासनाने खरा चेहरा उघड केला आहे, असा आरोप विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केला आहे.
एकीकडे एलबीटी रद्द करून व्यापाऱ्यांना खुष करण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देत असून शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेत बहुजन समाजातील विद्यार्थिनींना अज्ञानाच्या अंध:कारात ढकलत आहे़ या धोरणामुळे विद्यार्थिनींत असंतोष पसरला आहे़ शासनाने आठ दिवसांत नर्सिंगची शिष्यवृत्ती सुरू न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता परिषदेने दिला़ निवेदन देताना इंदू वानखेडे, प्रीती खुडसंगे, अनिरूद्ध गवई, संजय म्हस्के, किशोरी विलोकर, संगीता काविस्कर, मोनिका मडावी, शिल्पा गोल्हर, प्रतिमा महाजन, कांचन गवई, स्वाती कासारे, कोमल तायडे, प्रेमा वानखेडे आदी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Nursing scholarship canceled; Bandla composite response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.