न.प. शिक्षकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: November 11, 2015 01:30 IST2015-11-11T01:30:05+5:302015-11-11T01:30:05+5:30
वर्धा नगरपालिका शाळेतील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप वेतन देण्यात आलेले नाही.

न.प. शिक्षकांची दिवाळी अंधारात
वर्धा : वर्धा नगरपालिका शाळेतील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या दिवाळीवर अंधाराचे सावट गडद झाले आहे. दिवाळीपूर्वी वेतन व निवृत्तीवेतन देण्याची मागणी मुख्याधिकारी नगर परिषद, वर्धा यांच्याकडे करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन अप्राप्त आहे.
आॅक्टोबर महिन्यातील कार्यरत शिक्षकांचे वेतन व निवृत्तीवेतनाचे धनादेश पालिका प्रशासनाला प्राप्त झाले. नगर परिषदेकडून वाटपाकरिता लागणारी २० टक्के रक्कम देण्यात आली नसल्यामुळे वेतन प्रलंबीत आहे. कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवानिवृत्तांना वेतन शनिवारी देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका शिक्षकांना सहन करावा लागत आहे. वेतन व निवृत्तीवेतनाचे धानादेश नगर परिषदेला प्राप्त झाले असताना ते वटवून कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांना त्याचे वाटप करता आले असते. परंतु येथील मुख्याधिकारी शनिवारपासून रजेवर असल्याने काम प्रलंबीत आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले. या मागण्यांची दखल घेत त्वरीत निर्णय घेऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. हे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)