न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या निवासाला नागरिकांचा घेराव
By Admin | Updated: December 4, 2014 23:14 IST2014-12-04T23:14:02+5:302014-12-04T23:14:02+5:30
येथील संत तुकडोजी वॉर्डातील लोकमान्य गृहनिर्माण सोसायटीच्या १० टक्के खुल्या जागे पैकी काही जागेवर बांधकामाला सुरुवात झाली. ते बांधकाम हटविण्यात यावे म्हणून किसान अधिकार अभियानसह

न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या निवासाला नागरिकांचा घेराव
हिंगणघाट : येथील संत तुकडोजी वॉर्डातील लोकमान्य गृहनिर्माण सोसायटीच्या १० टक्के खुल्या जागे पैकी काही जागेवर बांधकामाला सुरुवात झाली. ते बांधकाम हटविण्यात यावे म्हणून किसान अधिकार अभियानसह या सोसायटीचे नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या निवासस्थानी गुरुवारी घेराव आंदोलन केले. शेवटी मुख्याधिकारी जगताप यांनी प्रशासकीय अधिकारी कन्हाके यांना सदर विनापरवानगी अवैध बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सदर ले-आऊटच्या २ लाख ६० हजार ९२४ चौरस फुटांपैकी ११ हजार ८८० चौरसफुट जागा शासनाने पुरग्रस्तांच्या वसाहतीसाठी राखीव ठेवली. उर्वरीत २ लाख ४९ हजार ४४ चौरस फुटावर लोकमान्य गृहनिर्माण सोसायटीचे ले-आऊट आहे. यापैकी १० टक्के जागा ले-आऊट मधील नागरिकांना वापरासाठी आरक्षीत होती. उर्वरीत जागेवर ६९ भुखंडाला मंजुरी देण्यात आली. खुल्या जागेवर शिव मंदिर असून पालिकेने तिथे हातपंप लावल्याचे नागरिंकांचे म्हणणे आहे.
शासनाने पुरग्रस्तांसाठी राखीव ११,८८० चौरसफुट जागेला १० टक्के खुल्या जागेत परिवर्तीत करून ५ जून २००४ मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सुधारीत आदेशाने या राखीव जागे पैकीच्या काही जागेवर भुखंडाला मंजुरी दिली. सदर भुखंडाची मंजुरी अवैध व गैरकायदेशीर असल्याचा या ले-आऊट मधील नागरिकांचा आरोप आहे. या संदर्भात न्यायालयीन कारवाई सुरू असतानाही काही भुखंड धारकांनी बांधकाम सुरू केले. ते रोखण्याच्या पालिकेच्या सूचना आहे. परंतु सदर झालेले बांधकाम अवैध असण्याचा नागरिकांनी आरोप करीत मुख्याधिकारी जगताप यांना घेराव घातला. त्यांनी सदर बांधकाम हटविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. घेराव आंदोलनात किसान अधिकार अभियानचे प्रवीण उपासे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)