आता एका कॉलवर मतदारांना मिळेल माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:47 IST2019-01-22T21:46:23+5:302019-01-22T21:47:04+5:30
मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.

आता एका कॉलवर मतदारांना मिळेल माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असून पूर्वतयारीने वेग घेतला आहे. या निवडणुकीबाबत नागरिक व मतदारांच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन व्हावे, निवडणूक प्रणालीबाबत त्यांना माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा निवडणूक शाखेमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १९५० वर फोन करून संपर्क करता येणार आहे. सुटीचा दिवस वगळून रोज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये या केंद्रात संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हे केंद्र २४ तास सुरू ठेवले जाणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लॅन्डलाईन क्रमांकावरून उपलब्ध करून दिली असून लवकरच मोबाईलवरूनसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
असा निवडला १९५० क्रमांक
निवडणूक विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १०५० रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाची स्थापना झालेले वर्ष १९५० लक्षात घेऊनच निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी १९५० क्रमांकाची निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: १९५० या कमांकावर संपर्क या सेवेचे उद्घाटन केले आहे.
आगामी लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी व त्यांच्या मतदारयादी व निवडणूकविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने १९५० हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक व मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.