मेंदूची गरज नसल्याने आता तोही काढावा लागेल
By Admin | Updated: November 16, 2015 00:36 IST2015-11-16T00:36:05+5:302015-11-16T00:36:05+5:30
आम्ही कृत्रिम गरजा निर्माण करतो आहोत. याची सुरुवात कॅल्क्यूलेटर पासून झाली असून आता ती इंटरनेट व मोबाईलपर्यंत पोहचली

मेंदूची गरज नसल्याने आता तोही काढावा लागेल
चंद्रशेखर धर्माधिकारी : पवनार येथे मित्र मिलन सोहळा
पवनार : आम्ही कृत्रिम गरजा निर्माण करतो आहोत. याची सुरुवात कॅल्क्यूलेटर पासून झाली असून आता ती इंटरनेट व मोबाईलपर्यंत पोहचली. मनुष्याला आपल्या मेंदूचा वापरच करायची गरज या साधनांमुळे नाही. माणसाची उत्पत्ती ही बंदरापासून झाली, तेव्हा त्याला शेपूट होते. शेपटाची गरज नसल्यामुळे ते काढून टाकण्यात आले, आता मेंदूची गरज नसल्यामुळे तोही काढावा लागेल असे परखड मत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
पवनार येथील ब्रह्मविद्या आश्रम येथे रविवारपासून आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण सोहळ्यानिमित्त मित्र मिलन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम सकाळी ९.३० वाजता आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली.
सेवाग्राम-पवनार विकास आराखड्याबाबत आम्ही सरकारचा पैसा घेणार नाही, या भूमिकेवरही धर्माधिकारी यांनी कठोर टिका केली. सरकारचा पैसा चालत नाही मग धनाढ्यांनी दिलेला पैसा कसा चालतो. त्यांनी दिलेला पैसा खरच शुद्ध असतो का असा सवालही त्यांनी केला. गांधी आश्रमची सद्यस्थितीत काय अवस्था आहे, यावर चिंतन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
सुरुवातीला ब्रह्मविद्या मंदिरचे गौतमभाई बजाज यांनी विचार मांडताना आश्रम मोठा होत असेल तर त्याचे बाह्यरूपही मोठे होत जाते. पण त्याच वेळी आतल्या गोष्टी छोट्या छोट्या होत जातात. तेव्हा आश्रम छोटा असला तरी चालेल परंतु त्याचे आंतरिक रूप मोठे असावयास पाहिजे असे ते म्हणाले.
सोहळ्यामध्ये बालभाई, डॉ. जाजू, शत्रुघ्न झॉजी यानीही आपले विचार व्यक्त केले. तीन दिवस चालणाऱ्या मित्र मिलन सोहळ्यामध्ये जय जगत या विषयावर व्यापक चिंतन होणार आहे.(वार्ताहर)