आता एसडीओ करणार टॉवरचा न्यायनिवाडा
By Admin | Updated: May 21, 2015 02:08 IST2015-05-21T02:08:35+5:302015-05-21T02:08:35+5:30
सिंदी (मेघे) येथे ‘फोर जी’ रिलायन्स टॉवर शहानिशा न करता ते काढण्याचे पत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले.

आता एसडीओ करणार टॉवरचा न्यायनिवाडा
वर्धा : सिंदी (मेघे) येथे ‘फोर जी’ रिलायन्स टॉवर शहानिशा न करता ते काढण्याचे पत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले. लेखी न दिल्याने ग्रामस्थांनी टॉवर काढण्याची मागणी लावून धरली. यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यास ग्रा.पं. ला बाध्य केले. अखेर मंगळवारी ३०० ते ४०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा पार पडली. यात उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी न्यायनिवाडा करावा, असा ठराव घेण्यात आला.
ग्रामविस्तार अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सभेत ग्रामस्थांतर्फे विजय नगराळे यांनी टॉवर काढण्याच्या कारवाईबाबत विचारणा केली असता तुमच्या वॉर्डातील टॉवर गावठाण हद्दीबाहेर असल्याने ते काढण्याचा अधिकार ग्रा.पं. नाही. ही कारवाई केवळ उपविभागीय अधिकारी करू शकतात, असे सांगितले. यामुळे ग्रामसभेत ग्रामपंचायत उपविभागीय अधिकाऱ्यांना टॉवर काढण्याबाबत पत्र देतील, वीज जोडणीचे नाहरकत प्रमाणपत्र नसलेल्या टॉवरची वीज खंडित करावी, असे नोटीस महावितरणला देण्यात येईल, असा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच सुषमा येसनकर, उपसरपंच मंगेश कांबळे, सदस्य उत्कर्ष देशमुख, भास्कर इथापे, धर्मराज वैद्य, उमेश दरणे, विजय नगराळे, किशोर बाहे, सचिन बमनोटे, मंगेश दरणे, पुरूषोत्तम आत्राम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)