आता सुटीच्या दिवशी मिळणार नाही पेट्रोल
By Admin | Updated: November 4, 2016 01:51 IST2016-11-04T01:51:04+5:302016-11-04T01:51:04+5:30
औषधी दुकाने आणि पेट्रोल पंप कधीही बंद राहत नाहीत; पण आता पेट्रोल पंपही बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोलियम असोसिएशनद्वारे घेण्यात आला आहे.

आता सुटीच्या दिवशी मिळणार नाही पेट्रोल
पेट्रोलपंपधारकांचे आंदोलन : दोन दिवस खरेदी बंद तर शनिवारी एकाच शिफ्टमध्ये विक्री
वर्धा : औषधी दुकाने आणि पेट्रोल पंप कधीही बंद राहत नाहीत; पण आता पेट्रोल पंपही बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोलियम असोसिएशनद्वारे घेण्यात आला आहे. यामुळे वाहन धारकांना सुटीच्या दिवशी पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. परिणामी, सुटीमध्ये फिरायचे ‘प्लानिंग’ असेल तर पेट्रोल, डिझेलची सोय आधीच करून ठेवावी लागणार आहे.
अपूरे डिलर मार्जीन यासह विविध प्रलंबित मागण्यांकरिता जिल्हा पेट्रोलियम असोशिएशनने आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. या आंदोलनामुळे वाहन धारकांना पेट्रोल, डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. गुरूवार व शुक्रवारी पंप धारकांनी खरेदी बंद ठेवली आहे. यानंतर शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या एकाच शिफ्टमध्ये पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात येणार आहे. गुरूवार आणि शुक्रवारी पेट्रोल, डिझेलची खरेदी होणार नसल्याने शनिवारी व सोमवारी पेट्रोल उपलब्ध होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शिवाय आता सुटीच्या दिवशी वाहन धारकांना पेट्रोल मिळणार नाही. तत्सम निर्णय असोसिएशनद्वारे घेण्यात आला आहे. रविवारी आणि बँकेच्या सुटीच्या दिवशी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुट्यांच्या दिवसांत वाहन धारकांना पेट्रोल उपलब्ध होणार नसल्याने तत्पूर्वीच सोय करून ठेवावी लागणार आहे. गुरूवारी सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू असले तरी शुक्रवारी किती पंपांवर पेट्रोल, डिझेल मिळेल, हे सांगणे कठीण आहे. पेट्रोल पंप धारकांच्या या बंदचा फटका सामान्य व नोकरदार वाहन चालकांना बसणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
पंपांवर लागताहेत वाहनांच्या रांगा
पेट्रोलियम असोसिएशनद्वारे राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. यात वर्धा जिल्ह्यातील असो.ने मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवस एकाच शिफ्टमध्ये पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात आली. यानंतर गुरूवार, शुक्रवारी खरेदी बंद ठेवली तर शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच पेट्रोल मिळेल.