आता फळ पिकांनाही विमा संरक्षण
By Admin | Updated: January 31, 2015 01:55 IST2015-01-31T01:55:47+5:302015-01-31T01:55:47+5:30
जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान ..

आता फळ पिकांनाही विमा संरक्षण
वर्धा : जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान आधारीत फळ पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत विमा काढता येणार आहे़
वर्धा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि केळी फळ पिकांना १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१५ पर्यंत गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत विमा प्रस्तावानुसार देय होणारी नुकसान भरपाई पूर्णपणे संबंधित विमा कंपनी शेतकऱ्यांना परस्पर अदा करणार आहे. फळ पिकाचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांनी गारपीट झाल्यानंतर ४८ तासांच्या आत संबंधित बँकेला, विमा कंपनीला आणि कृषी विभागाला त्वरित कळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकाचा विमा उतरविल्यानंतर विम्याची रक्कम विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे़ वेळेवर विमा प्रस्ताव बँकेकडून सादर न झाल्यास नुकसान भरपाई संबंधित संस्था अदा करील. हवामान आधारीत फळ पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे़
संत्रा फळपिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, रोहणा, खरांगणा आणि वाठोडा, कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी आणि कन्नमवारग्राम तर आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव येथील बागायतदार शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ शिवाय मोसंबी फळपिकांसाठी कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी व कन्नमवारग्राम, आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव आणि केळी पिकांसाठी सेलू तालुक्यातील झडशी या महसूल मंडळामधील शेतकरी हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविलेली ही पीक विमा योजना आता फळ पिकांनाही लाभदायक ठरणार, असे चित्र आहे़(कार्यालय प्रतिनिधी)