आता सोयाबीन पिकावर पाखरांचे लक्ष
By Admin | Updated: September 18, 2014 00:01 IST2014-09-18T00:01:58+5:302014-09-18T00:01:58+5:30
अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़

आता सोयाबीन पिकावर पाखरांचे लक्ष
घोराड : अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़
जून महिन्याच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या केल्या व पावसाने दडी मारलेल्या कालावधीत तुषार सिंचनाने ओलित केले, ते सोयाबीनचे पीक मळणी व कापणीयोग्य झाले आहे़ असे पीक फार कमी शेतांमध्ये असल्याने दाणे भरलेल्या शेंगावर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या प्रहारात पाखरांचे थवेच्या थवे या सोयाबीन पिकावर बसत असून आपल्या पोटाची खळगी भरताना पाहायला मिळत आहे. अशा शेतात सकाळपासून ‘पिंप’ वाजविणारा व्यक्ती राखण करीत असला तरी पाखरांना तो आवाज नित्याचा झाला की काय, तर पाखरे या आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात़
पाखरे पिकावरून शेतातून गेलेल्या विजेच्या तारावर बसून या शेंगांना लक्ष्य बनवित आहे़ यामुळे अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हातात येणाऱ्या नगदी पिकापासून मुकावे लागण्याची वेळ आली आहे़ हा खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवित असल्याचेच यावरून दिसते़
सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी झाल्याने एकाच वेळी सर्व शेतात सुगीचा हंगाम आला नाही़ यामुळे असे घडत आहे. आधी रानडुक्कर व रोह्यांच्या कळपाने उभ्या पिकात थैमान घातल्याने बळीराजा मेटाकुटीस आला़ आता पीक मळणीयोग्य असताना पाखरांनी हल्ला केल्याने सोयाबीनच संकटात आले आहे़ यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे़(वार्ताहर)