आता शेतकरी फिरतोय मजुरांच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 23:59 IST2015-05-05T23:59:46+5:302015-05-05T23:59:46+5:30
शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते. कारण शेती हाच ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग आहे.

आता शेतकरी फिरतोय मजुरांच्या शोधात
शेती मशागतीच्या कामांना वेग : यंदा शेतमजुरीत वाढ होण्याची शक्यता
घोराड : शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते. कारण शेती हाच ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग आहे. त्यामुळे भारतासारख्या खेड्यांच्या देशामध्ये संपूर्ण देशाच्या आर्थिक स्वास्थाची जबाबदारी पर्यायाने या शेतकऱ्यांवर आहे. पण तोच शेतकरी आज मजुरांच्या टंचाईमुळे अडचणीत आला असल्याची स्थिती आहे. शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला तरी मजूर मिळेना अशी स्थिती परिसरातील गावात निर्माण झाली आहे.
काम मिळावे, मजूरी करून पोटाची खळगी भरावी म्हणून दिवस उजाडल्या बरोबर पूर्वी मजूराला कामाचा शोध घ्यावा लागत होता. काम आहे का म्हणून मजूर आधी शेतकऱ्यांच्या दारात जावून विचारायचा पण आता शेतकऱ्यांनाच मजूरांच्या दारी, फिरण्याची वेळ आली आहे. शिवाय एवढं फिरूनही मजूर मिळत नाही अशी विदारक परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. वाजवीपेक्षा जास्त मजूरी देवून मजूर कामावर येतो. तरीही मनासारखे व चांगले काम होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
शेती व्यवसाय व शेतीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसते. त्या तुलनेत लोकसंख्या मात्र सपाट्याने वाढत आहे. शेती कामे आणि लोकसंख्या अफाट यांच्या विचार केला तर मजूरांची कमतरता भासायलाच नको. परंतु परिस्थिती मात्र याउलट आहे. दिवसागणिक गावागावात मजूर मिळेनासा झाला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. पूर्वी कामाच्या शोधात असलेला शेतमजूर शेतकऱ्यांला कामासाठी विनवणी करायचा, शेतकऱ्याने नाही म्हटल तर थोडतरी काम द्या अशी विणवणी केली जात. पण आता काही काम केले नाही तरी मजूराची चूल पेटायची राहणार नाही अशी स्थिती पालटली आहे.
शेतकऱ्यांवर आता मजूरांच्या दारी फिरण्याची वेळ आली आहे. प्रत्येक गावात काही विशिष्ट लोकच शेतमजूरीचे काम करतात. परिसरातील चित्र पाहले असता ८० टक्के घरी फक्त महिला वर्गच मजुरीला जातात. यांत्रिकीकरणाच्या काळातही मजुरांची आवश्यकता भासते. तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. यात मजुरांची वेळ कमी केली तरीही पैसे द्यावे लागत आहे. यंदाच्या नापिकीने शेती मशागतीचे कामे कशी करावी असा प्रश्न असताना शेतकऱ्यांना मजुराकरिता भटकंती करावी लागत असल्याने दुहेरी संकट आले आहे. घड्याळाचे काटे बघून काम होत असल्याने कामात लक्ष राहत नाही. शेतकऱ्यांना शेतमालाला खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याची स्थिती आहे. यातच यंदा मजुरीचे दर वाढण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांपुढे नवी समस्या आली आहे.(वार्ताहर)
ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू हरवतोय
शेतकऱ्यांना सततची नापिकी यासह मजुराच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच मजुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला तरी मजूर मिळेना अशी स्थिती परिसरातील गावात निर्माण झाली आहे.
वाजवीपेक्षा जास्त मजूरी देवून मजूर कामावर येतो. तरीही मनासारखे व चांगले काम होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
यांत्रिकीकरणाच्या काळात शेतीची काही कामे आजही मजुरांकरवी होत असतात. यात शेतकऱ्यांना फरपट होत आहे.