Now the beneficiaries will get the ID, the photo will be clicked | आता लाभार्थ्यांना मिळेल आयडी, फोटोही होणार क्लिक
आता लाभार्थ्यांना मिळेल आयडी, फोटोही होणार क्लिक

ठळक मुद्देशिवभोजन योजना । आजपासून जिल्ह्यात होणार प्रारंभ

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गरजूंना अवघ्या दहा रुपयांत जेवण देण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला प्रजातसत्ताकदिनी २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाणार आहे.
शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पाहण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून आॅनलाईन मॉनिटरिंग केले जाणार आहे. थाळीचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन केंद्राच्य काउंटरवर लाभार्थ्यांचे फोटो क्लिक करून संपूर्ण माहिती संगणकात फीड केली जाणार आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती शासनाने दिलेल्या लिंक कंट्रोलकडे जाईल आणि तेथूनच संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट होईल. तसेच त्यानंतर शासनाने दिलेल्या केंद्राच्या संगणकावर संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच व्यक्तीला शिवभोजनाचा लाभ मिळणार आहे. शासकीय कर्मचारी आणि सधन व्यक्तींसाठी ही योजना नसून केवळ गरजूंसाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी गरीब किंवा मजुरांची वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी शिवभोजन थाळी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत संबंधित भोजनालयांमध्येच दुपारी १२ ते २ या कालावधीत गरजूंना शिवभोजनाचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीत लाभार्थ्याना राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भोजनालय मालकाची असणार आहे. भोजनालयात एकावेळी किमान २५ व्यक्तींची भोजनाची व्यवस्था राहणार आहे. भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करून त्यासंदर्भातील प्रमाणपत्र दर्शनी भागात भोजनालय चालकाला लावावे लागणार आहे.

Web Title: Now the beneficiaries will get the ID, the photo will be clicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.