क्रीडा संकुलांना आता वार्षिक अनुदान
By Admin | Updated: September 30, 2015 05:41 IST2015-09-30T05:41:13+5:302015-09-30T05:41:13+5:30
क्रीडा व खेळ मंत्रालयाच्या विविध योजनांमार्फत जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची निर्मिती करण्यात आली. शिवाय

क्रीडा संकुलांना आता वार्षिक अनुदान
प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा
क्रीडा व खेळ मंत्रालयाच्या विविध योजनांमार्फत जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची निर्मिती करण्यात आली. शिवाय पायकांतर्गत ग्रामीण भागात क्रीडांगण तयार करण्यात आले. यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला. क्रीडा संकूल व क्र्रीडांगण बांधकामांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधी देण्यात आला; पण देखभाल, दुरूस्तीची तरतूदच नव्हती. आता विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी अनुदान दिले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संकुलांना नवसंजीवणीच मिळणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने विविध खेळांना तसेच खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध योजना राबविल्या जातात. यात पायकांतर्गत ग्रामीण भागात क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलांचीही निर्मिती केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील आठपैकी चार तालुक्यांच्या क्रीडा संकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार तालुक्यांच्या क्रीडा संकुलांना जागेचा वाद भोवल्याचेच दिसते. क्रीडा संकुलांच्या बांधकामासाठी शासनाकडून निधीही देण्यात आला आहे. यात जिल्हा क्रीडा संकुलासाठी आठ कोटी तर तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी क्रीडा संकुलांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी कुठलाही निधी देण्यात येत नव्हता. यामुळे क्रीडा संकुलांची दुरवस्था होत होती. जिल्हा व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे क्रीडा संकूल देखभाल, दुरूस्तीकरिता निधी नसल्याने संकुलांची दुरवस्था कायम राहत होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकूल देखभाल, दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात विभागीय क्रीडा संकुलाकरिता प्रथम वर्षी १५ लाख, दुसऱ्या वर्षी १२.५० लाख तर तिसऱ्या वर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी पहिल्या वर्षी दहा लाख, दुसऱ्या वर्षी साडे सात लाख तर तिसऱ्या वर्षी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुलाकरिता प्रत्येक वर्षी तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. क्रीडा संकुलांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने २२ जून २०१५ रोजी पाठविला होता. त्या अनुषंगाने या योजनेत २०१५-१६ साठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून तशी तरतूद करण्यात आली आहे. सध्या ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.
हा निधी प्रत्येक वर्षी संकूल देखभालीसाठी प्रस्तावित केलेले अनुदान आणि क्रीडा संकुलास प्राप्त होणारे उत्पन्न यातून येणारी तूट यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून मंजूर करण्यात येणार आहे. संकुलाचा विमा उतरवावा लागणार असून या योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात मिळणाऱ्या अनुदानाचे वितरण शासन मान्यतेने करण्यात येणार आहे. क्रीडा संकुलांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने खऱ्या अर्थाने खेळांना व खेळाडुंना चालना मिळणार आहे.
४वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, देवळी व सेलू या तालुक्यांच्या क्रीडा संकुलांचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. कारंजा, वर्धा ग्रामीण आणि समुद्रपूर येथील तालुका क्रीडा संकुलाला जागाच उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. हिंगणघाट येथील तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न मिटला आहे. बसपाच्या मोर्चामुळे सुरू झालेले बांधकाम बंद करण्यात आले होते; पण ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्सम आदेश दिले असून विद्यमान आमदारांनीही बांधकाम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामीण क्रीडांगणांचा प्रश्न कायम
४पायकांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात क्रीडांगणे तयार करण्यात आली होती. या क्रीडांगणांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता; पण त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकरिता निधी देण्यात आला नाही. नवीन शासन निर्णयातही ग्रामीण क्रीडांगणांचा उल्लेख केलेला नाही. यामुळे ग्रामीण क्रीडांगणांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्षच होणार असल्याचे दिसते.
वर्धा जिल्ह्यातील चार तालुका संकूल पूर्ण झाले असून तीन ठिकाणी जागेचा अभाव आहे. हिंगणघाट येथील जागेचा वाद मिटला; पण बसपाने आंदोलन केल्याने काम बंद झाले. आता जिल्हाधिकारी व आमदार यांच्या निर्देशावरून पुन्हा काम सुरू होणार आहे. संकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखभाल, दुरूस्ती निधी उपलब्ध होईल. या निर्णयामुळे क्रीडा संकूल व्यवस्थापनाला सहकार्यच होणार आहे.
- सुभाष रेवतकर, विभागीय उपसंचालक, क्रीडा विभाग, नागपूर.