कोविडमुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे दोन्ही रुग्णालयं होताहेत फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:00 AM2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:12+5:30

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.

Not because of covid, but because of dengue victims, both hospitals are full | कोविडमुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे दोन्ही रुग्णालयं होताहेत फुल्ल

कोविडमुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे दोन्ही रुग्णालयं होताहेत फुल्ल

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा एकाचा घेतला बळी : सावधान ! ७० टक्के रुग्णांना चढवाव्या लागतेय प्लेटलेट्स

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी डेंग्यू या आजाराने चांगलेच डोकेवर काढल्याने कोरोनामुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे रुग्णालयांमधील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या सुमारे १२९ हून अधिक डेंग्यूसदृश बाधितांवर उपचार सुरू असून, नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सध्या ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत. मागील साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात ९८ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे, तर एका व्यक्तीचा डेंग्यू या आजाराने बळी घेतला आहे. जिल्ह्यात नवीन कोविडबाधितांच्या तुलनेत डेंग्यू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या रुग्णखाटांचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.

कस्तुरबाच्या मेडिसीन विभागातील सर्व बेड फुल्ल
- काेविड संकटाच्या काळात प्रत्येक कोविडबाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील मेडिसीन विभागातील बेडवर सध्या डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये सुमारे ३० मुले असून, ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत.

कस्तुरबा रुग्णालयातील मेडिसीन विभागात डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू असून, सध्या रुग्णखाटा फुल्ल झाल्या आहेत. ७० टक्के डेंग्यू बाधितांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत असून, नागरिकांनीही डेंग्यूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घेत औषधोपचार घ्यावा. शिवाय प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करून अडलेले पाणी वाहते करावे.
- डॉ. नितीन गगने, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम

डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. त्यामुळे सहा नगरपालिका, चार नगरपंचायती व सर्व ग्रामपंचायतींना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा

जिल्ह्यात डेंग्यू डोकेवर काढत आहे. त्यामुळे नागरिकानी दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सध्या ४९ डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, आ.वि.भा. ग्रामीण रुग्णालय.

 

Web Title: Not because of covid, but because of dengue victims, both hospitals are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.