‘त्या’ नऊ चोऱ्यांचा कुठलाही सुगावा नाही
By Admin | Updated: October 20, 2014 23:16 IST2014-10-20T23:16:54+5:302014-10-20T23:16:54+5:30
शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या. यात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना एका नाल्यात चोरट्यांनी बदलविलेले कपडे

‘त्या’ नऊ चोऱ्यांचा कुठलाही सुगावा नाही
वर्धा : शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या. यात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना एका नाल्यात चोरट्यांनी बदलविलेले कपडे व घरफोड्या करताना वापरण्यात आलेले शस्त्र आढळले. ते जप्त केले; मात्र चोरटे पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
या चोऱ्यांत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी पारधी बेड्यावरील लोकांनी केला असल्याचा संशय घेत पोलिसांनी शहरालगत असलेल्या पारधी बेड्यांवर तपास मोहीम राबविली. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही.
या तपासादरम्यान पोलिसांना येळाकेळीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका नाल्यात चोरट्यांनी बदलविलेले कपडे व चोरीत वापरलले शस्त्र सापडले. यातून चोरट्यांचा काही सुगावा लागेल असे वाटत असताना कुठलाही सुगावा लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
निवडणूक कामात पोलीस व्यस्त असल्याने चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना करणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांची एक बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. येथूनच पोलिसांचे पथक तयार करून त्यांना वेगवेगळ्या दिशेने पाठविण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे शहर ठाण्यातून सांगण्यात आले आहे. तपासात पोलिसांच्या हाती काही येते वा नाही याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)