धामप्रकल्प कोरडाठाक; वर्ध्यात जलसंकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:29 PM2019-07-17T13:29:43+5:302019-07-17T13:34:26+5:30

वरुणराजा चांगलाच रुसल्याने वर्ध्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शहरासह १३ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारा धामप्रकल्प कधीचाच कोरडा झाला. पावसाच्या प्रतीक्षेत मृतसाठ्यातील पाणी उपसून नागरिकांची तहान भागविली जात आहे.

No water in Dham dam; water crisis in Wardha district | धामप्रकल्प कोरडाठाक; वर्ध्यात जलसंकट?

धामप्रकल्प कोरडाठाक; वर्ध्यात जलसंकट?

googlenewsNext
ठळक मुद्देमृतसाठाही संपण्याच्या मार्गावरशहरासह तेरा ग्रामपचांयतींमध्ये पाणीबाणी

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वरुणराजा चांगलाच रुसल्याने वर्ध्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शहरासह १३ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारा धामप्रकल्प कधीचाच कोरडा झाला. पावसाच्या प्रतीक्षेत मृतसाठ्यातील पाणी उपसून नागरिकांची तहान भागविली जात आहे. परंतु, पावसाने चांगलीच दडी मारल्याने मृतसाठ्यातील पाणीही आता दहा ते पंधरा दिवसच पुरणार असल्याने वर्ध्यात जलसंकट गडद होत आहे.
जिल्ह्यात ११ मोठे तर ४ मध्यम जलाशये आहेत. या सर्व जलाशयांतील पाण्यावर जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य आणि प्राणीमांत्राचा जीव आहे. यावर्षी कधी नव्हे इतका पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसातच जलाशयांची पातळी झपाट्याने खालावली. अनेक जलाशयांनी एप्रिल महिन्यात तळ गाठल्याने नागरिकांना पाण्यासाठी दहीदिशा भटकंती करावी लागली. जून महिन्यात दमदार पावसाची अनेकांना अपेक्षा होती.
परंतु, वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने जुलै महिना अर्धा संपत आला तरीही दमदार पावसाची हजेरी लागली नाही. परिणामी, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा शहरासह नजीकच्या १३ ग्रामपंचायतींना महाकाळी येथील धामप्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या प्रक ल्पातील पाण्याचे जून अखेरपर्यंत नियोजन करून वर्धेकरांना सुरुवातीला दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर तो आठ दिवसांआड, सहा दिवसांआड होत होता. परंतु, जूनच्या अखेरपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने जलाशय कोरडे पडले.
त्यामुळे या जलाशयातील मृतसाठ्यातून पाणी काढून नागरिकांची तहान भागविण्यात आली. पावसाअभावी आता या जलाशयात दहा ते पंधरा दिवसपर्यंत पुरेल इतकेच मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरासह १३ ही ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार असल्याने प्रशासनानेही याकरिता उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील पाणी पळाले
मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला होता. यावर्षी भरघोस उत्पन्न येईल या आशेने शेतकरी कामाला लागले होते. खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने पेरणीला विलंब झाला. त्यामुळे यावर्षी ३ लाख २६ हजार २३५ हेक्टरवरच लागवड करण्यात आली. जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावताच पेरणीला सुरुवात झाली. सोय असलेले शेतकरी सिंचनाने पिके जगवित आहेत. परंतूु, आता पावसाअभावी पाण्याचे स्रोतही आटले आहे. तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांची दुबार पेरणीही जमिनीतच गडप झाली. नव्याने पेरणी करण्याचे दिवस निघून गेलेत. आता रब्बीची तयारी करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्यामुळे याही हंगामात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील पाणी उडाले आहे.

शहरासह १३ ग्रामपंचायतींना महाकाळीच्या धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा होता. या जलाशयातील मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. आता या जलाशयात केवळ दहा ते पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतही माहिती देण्यात आली आहे.
- एस. बी. काळे, कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभाग

जिल्ह्यातील जलाशयाची स्थिती अत्यंत भीषण आहे. पावसानेही दडी मारल्यामुळे शेतशिवारातील प्रसन्नताही हिरावल्याने शेतकरी चिंतेत आहे. ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये सर्वच जलाशयांची स्थिती दर्शविली असून या स्थितीची पाहणी करून कृत्रिम पाऊस पाडण्याची विनंती करण्यात आली आहे. सर्वाधिक भर मात्र धामप्रकल्पावर देण्यात आला आहे.
-विवेक भिमनवार,
जिल्हाधिकारी

Web Title: No water in Dham dam; water crisis in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.