वर्धेकर आज घेणार ‘नो व्हेईकल डे’चा निर्णय
By Admin | Updated: December 20, 2015 02:06 IST2015-12-20T02:06:30+5:302015-12-20T02:06:30+5:30
वर्धेकरांच्या आरोग्यासह पर्यावरणाचे संतुलन राखावे, हा उद्दात्त हेतू पुढे ठेवून ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘नो व्हेईकल डे’ ...

वर्धेकर आज घेणार ‘नो व्हेईकल डे’चा निर्णय
दुपारी ४ वाजता निर्णायक बैठक : ३२ संघटनांचे प्रतिनिधी हजर राहणार
वर्धा : वर्धेकरांच्या आरोग्यासह पर्यावरणाचे संतुलन राखावे, हा उद्दात्त हेतू पुढे ठेवून ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘नो व्हेईकल डे’ नेमका कोण्त्या दिवशी यापुढे नियमित पाळायचा हे रविवारी दुपारी ४ वाजता हुतात्मा स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आम्ही वर्धेकर आणि वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने आयोजित विविध संघटनांच्या बैठकीत ठरणार आहे.
या बैठकीला प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्यासह आम्ही वर्धेकर, वैद्यकीय जनजागृती मंच, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, न्यू इंग्लिश हायस्कूल, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा एमआयडीसी असोसिएशन, जनहित मंच, जे.बी.सायन्स कॉलेज, भारतीय माजी सैनिक संघटना, विदर्भ साहित्य संघ, फुलोरा, प्रहार समाज जागृती संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, किसान अधिकार अभियान, अध्ययन भारती, लायन्स क्लब, अध्ययन भारती, यशवंतराव दाते स्मृती संस्था, निमा(नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.), वर्धा डॉक्टर्स असोसिएशन, एच.एम.ए.आय., वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघ, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, राज्य कर्मचारी संघटना व महसूल संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नवभारत अध्यापक विद्यालय व रूद्रा ग्राफिक्स, बापू युवा संगठन, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. बैठकीमध्ये ‘नो व्हेईकल डे’बाबत साधक-बाधक चर्चेअंती सर्वानुमते निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
‘लोकमत’च्या ‘नो व्हेईकल डे’ ‘इनिशिएटिव्ह’ला वर्धेकरांकडून भरभरुन प्रतिसाद देतानाच ही मोहीम राबविण्यासाठी ‘लोकमत’चे अभिनंदन करणारे पत्रही काही संघटनांनी कार्यालयात पाठविले आहे. यामध्ये आमचा ‘नो व्हेईकल डे’ला पूर्ण पाठींबा असल्याचे नमुद करीत सक्रिय सहभागाची ग्वाही देत आहे.
‘नो व्हेईकल डे’शी प्रत्येक वर्धेकर मनाने जुळलेला आहे. ही मोहीम वर्धेकरांची आगळीवेगळी चळवळ ठरली आहे. सर्व प्रतिनिधींनी आपल्या महत्त्वपूर्ण सूचनांसह बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगांवकर व वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)