जनजागृती संदेशाने ‘नो व्हेईकल डे’चा प्रारंभ

By Admin | Updated: December 25, 2015 02:44 IST2015-12-25T02:44:06+5:302015-12-25T02:44:06+5:30

‘लोकमत’ने मांडलेली संकल्पना आणि घेतलेला पुढाकार अंगिकारत वर्धेकरांनी पहिल्या गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’चे उत्स्फूर्त स्वागत केले.

'No Vehicle Day' starts with public awareness message | जनजागृती संदेशाने ‘नो व्हेईकल डे’चा प्रारंभ

जनजागृती संदेशाने ‘नो व्हेईकल डे’चा प्रारंभ

‘लोकमत इनिशिएटिव्ह’ला यश : ४६ संघटनांसह वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वर्धा : ‘लोकमत’ने मांडलेली संकल्पना आणि घेतलेला पुढाकार अंगिकारत वर्धेकरांनी पहिल्या गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’चे उत्स्फूर्त स्वागत केले. गुरूवारी सकाळी लोकमत कार्यालयापासून सकाळी ८.४५ वाजता सायकलद्वारे जनजागृती रॅली निघाली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत सहभागींनी हातात फलक घेत ‘नो व्हेईकल डे’बाबत जनजागृती केली. ‘लोकमत’च्या इनिशिएटिव्हमध्ये नागरिकांनीही सहभाग घेत गुरूवारची सुरूवात सायकलने केली.
‘लोकमत’च्या पुढकारातून ४६ सामाजिक संघटनांनी केलेल्या निर्धारानुसार दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळला जाणार आहे. नो व्हेईकल डेचा पहिला गुरूवार उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ठाकरे मार्केट येथील लोकमत कार्यालयासमोर आम्ही वर्धेकर आणि वैद्यकीय जनजागृती मंचच्या आवाहनाला ओ देत सहभागी संघटनांचे पदाधिकारी सायकलसह हजर झाले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल रॅलीचा तसेच ‘नो व्हेईकल डे’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, आम्ही वर्धेकरचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, अध्ययन भारतीचे हरीश इथापे, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष उदय मेघे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, नवभारत अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सुनील गावंडे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी, वर्धा एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे गुणवंत डकरे, माजी सैनिक संघाचे श्याम परसोडकर, राज्य कर्मचारी संघटना व महसूल संघटनेचे हरिश्चंद्र लोखंडे, प्रशांत झाडे, राजकुमार जाजू, अनिल नरेडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत कार्यालयासमोरून निघोलेली ही सायकल रॅली बजाज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचताच आठवड्याचा प्रत्येक गुरूवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. शासकीय सुटीचा दिवस असल्याने पहिल्या गुरूवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना नो व्हेईकल डे मध्ये सहभाग घेता आला नाही. वर्धेत हा पायंडा पडण्याकरिता पुढचा गुरूवार महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील गुरूवारी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी वाहनांचा वापर टाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘इनिशिएटीव्ह’मुळे शहरातील वाहनांचा वापर कमी करण्याचा एक संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे. प्रारंभी शहरातील सर्वच नागरिकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला नसला तरी सामाजिक संघटनांची ही चळवळ कालांतराने संपूर्ण वर्धेकरांची होईल, असे संकेत सायकल रॅलीतून मिळालेत.(कार्यालय प्रतिनिधी)

जागर ‘लोकमत’चा निर्धार वर्धेकरांचा
हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने खा. रामदास तडस हे दिल्ली येथे होते. खास ‘नो व्हेईकल डे’ करिता ते सकाळीच वर्धेतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हजर झाले. यावेळी खा. रामदास तडस यांनीही सुमारे एक किमीपर्यंत सायकल चालवून ‘नो व्हेईकल डे’ चा पुरस्कार केला. याप्रसंगी देवळीपर्यंत साईकलने जाण्याच्या प्रस्तावावर खा. तडस, वैद्यकीय जनजागृती मंच व अन्य पदाधिकाऱ्यांत चर्चा झाली; पण सर्वांना कर्तव्यावर जायचे असल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. खा. तडस यांनी देवळी शहरातही नो व्हेईकल डे पाळण्याकरिता पुढाकार घेणार असल्याचा संकल्प यावेळी जाहीर केला.
फलकांद्वारे लोकमतचे अभिनंदन व वर्धेकरांना शुभेच्छा
शहरातील महत्त्वाच्या चौकात नो व्हेईकल डेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन, तर हा दिवस पाळण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल वर्धेकरांना शुभेच्छा देणारे फलक वर्धेकरांचे लक्ष वेधत होते. तसेच यापुढे हा दिवस पाळण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. सिनेमा टॉकीज परिसरातील फलकही वर्धेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
नागरिकांमध्ये मंथन
‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारामुळे वर्धा शहरातील नागरिकांमध्ये याबाबत कुतूहलात्मक चर्चा होती. नो व्हेईकल डे कसा साजरा करणार, आपण कसे सहभागी व्हायचे यासह अनेक चर्चांना उधान आले होते. अनेक नागरिकांनी लोकमतला धन्यवाद दिले तर काहींचा विरोधाचाही सूर दिसला; पण रॅलीद्वारे केलेल्या जनजागृतीमुळे त्यांनीही नो व्हेईकल डे पाळण्याला दुजोराच दिला.
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
जनजागृतीपर मिरवणूक गांधी चौकातून महादेवपुरा येथील जामा मशिद येथे पोहचली. याप्रसंगी मुस्लीम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबी’निमित्त शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
चिमुकले व ज्येष्ठांचाही सहभाग
चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनीही हा दिवस पाळला. प्रा. सुचित्रा ठाकरे या चिमुकल्या अभिनवसोबत सहभागी झाल्या होत्या. नवभारत अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सुनील गावंडे हे आपल्या चिमुकल्या रिद्धी व अन्य चिमुकल्यासह सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.
४६ सामाजिक संघटनांचा अनोखा संगम
वृ्त्तपत्राने सामाजिक बांधिलकीचा परीचय देत नो व्हेईकल डेचा प्रस्ताव जनतेपुढे ठेवला. तो वाढत्या प्रदूषणावर आळा घालणार आहे. नागरिकांचे आरोग्य जपणारा असून काळाची गरज आहे ही बाब लक्षात येताच वर्धेतील वातावरण ढवळून निघाले. ही बाब हेरुन सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या परंतु भिन्न विचारधारेच्या वर्धेतील तब्बल ४६ संघटना यासाठी सरसावल्या. हा अनोखा संगम या निमित्ताने बघायला मिळाला.
अनेकांनी दर्शविली हा दिवस पाळण्याची तयारी
नो व्हेईकल डेच्या निमित्ताने शहरात उत्सुकतेचे वातावरण होते. अनेक नागरिक स्वत:हुन सायकल वा पायी प्रवास करणे पसंत करीत होते. लोकमत कार्यालयापासून निघालेली सायकल रॅली पाहुनही अनेकांनी हा दिवस यापुढे पाळण्याची प्रतिक्रीया ‘लोकमत’जवळ बोलून दाखविली.
सुदृढ आरोग्यासाठी सायकल
पर्यावरणाचा बचाव तसेच प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी सायकल चालविणे वा पायी चालणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊनच आठवड्यातून एक दिवस नो व्हेईकल डे पाळला जावा, अशी संकल्पना लोकमतने मांडली. या कल्पनेचा प्रशासन, पोलीस यंत्रणा, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पुरस्कार केला. मात्र शासकीय सुटी आल्याने या गुरुवारी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होता आले नाही.

Web Title: 'No Vehicle Day' starts with public awareness message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.