'गावांचा विकास झाला तरच देश मजबूत होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:12 PM2021-12-13T17:12:30+5:302021-12-13T17:17:34+5:30

शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले.

nitin gadkari reaction on rural development | 'गावांचा विकास झाला तरच देश मजबूत होईल'

'गावांचा विकास झाला तरच देश मजबूत होईल'

Next

वर्धा : ग्रामीण भागातील अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाला पाहिजे. तरच देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र सुधारेल व देश मजबूत होईल. हा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जीबीएमएम शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात केले.

हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल. विविध प्रकल्पातून रोजगाराची निर्मिती कशी होईल याचा विचार केला पाहिजे. 

गरिबांना जात, धर्म, पंथ, भाषा नसते. त्यांना केवळ विकासाचीच भूक असते आणि त्यासाठी रोजगार निर्मितीची गरज असून सिंदी (रेल्वे) येतील प्रस्तावित ड्रायपाेर्टमुळे वर्धा जिल्ह्यात २५ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. मागील पाच वर्षात हिंगणघाट शहराचा चेहरा बदलला असून याचे पूर्ण श्रेय आमदार कुणावार व नगराध्यक्ष बसंतानी तसेच संपूर्ण नगरसेवक आणि न.प. कर्मचाऱ्यांचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे आदींची उपस्थिती होती.

खा. रामदास तडस यांनी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या रेल्वे गाड्यांना तातडीने थांबा मिळावा अशी मागणी यावेळी केली. संचालन मंजूषा ठाकरे व दत्तात्रय पवार यांनी केले. आभार मुख्याध्यापक गंगाधर ढगे यांनी मानले. कार्यक्रमाला गिमा टेक्स इंडस्ट्रीजचे प्रशांतकुमार मोहता, विद्या भारतीचे प्रदेश अध्यक्ष रमेश धारकर, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती वसंत आंबटकर, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, जि. प. सभापती माधव चंदनखेडे, रिपाइंचे शंकर मुंजेवार आदींची उपस्थिती होती.

उड्डाण पूल व मेट्रोची हिंगणघाटकरांना भेट

गडकरी यांनी यावेळी येथील शहरातील मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरील कलोडे चौक ते सरकारी दवाखाना येथे उड्डाण पूल मंजूर केल्याची घोषणा केली. शिवाय नागपूर ते चंद्रपूर ही मेट्रो हिंगणघाट मार्गे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून हिंगणघाटकरांना सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे या दोन्ही मागण्या आमदार कुणावार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून गडकरी यांच्याकडे केल्या होत्या.

Web Title: nitin gadkari reaction on rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.