८८० कृषी केंद्रांवर नऊ पथकांची वक्रदृष्टी
By Admin | Updated: May 23, 2015 02:17 IST2015-05-23T02:17:05+5:302015-05-23T02:17:05+5:30
खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांनी त्यांची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील ८८० कृषी केंद्रांतून बियाणे व इतर साहित्याची खरेदी सुरू झाली आहे.

८८० कृषी केंद्रांवर नऊ पथकांची वक्रदृष्टी
शेतकऱ्यांकरिता तक्रार निवारण केंद्र : बियाण्यांबाबत सतर्कतेचा इशारा
वर्धा: खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांनी त्यांची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील ८८० कृषी केंद्रांतून बियाणे व इतर साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. यात शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने नऊ पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाची करडी नजर या कृषी केंद्रांवर राहणार आहे.
कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या नऊ पथकात एक जिल्हास्तरीय व आठ तालुकास्तरीय पथक कार्यरत राहणार आहे. एका पथकात एकूण पाच कर्मचारी राहणार आहे. पथकातील एकूण ४५ कर्मचाऱ्यांची नजर कृषी केंद्रावर राहणार आहे. या केंद्रातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
गत वर्षी जिल्ह्यात एकूण ६० केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. यातीन तिघांचा परवाना रद्द करण्यात आला होता तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतर कारवाईत सुमारे ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
यंदाच्या खरिपात ४.२० लाख हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. यात १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. याकरिता एकूण ७० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तर २ लाख ३८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. याकरिता एकूण १०.५६ लाख पाकिटांची गरज आहे. मात्र जिल्ह्यात आजच्याघडीला केवळ ३ लाख पाकिटे उपलब्ध झाली आहेत. कपाशीच्या बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची धावपळ होणार असल्याचे चित्र आहे. याचा लाभ घेत कृषी केंद्र चालकांकडून बियाण्यांच्या काळ्या बाजाराची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकऱ्यांना खरीपात खताकरिता भटकण्याची वेळ येणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. हंगामाकरिता ९४ हजार ४०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर असून ते जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. शिवाय रबी हंगामातील २३ हजार मेट्रिक टन खत शिल्लक असल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
घरगुती बियाण्यांचा वापर करताना उगवण क्षमता तपासण्याचा सल्ला
गत हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांचा वापर करावा लागणार आहे. यामुळे घरचे सोयाबीन पेरताना त्याची उगवण क्षमता तपासून त्याचा पेरा करण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घेण्याची वेळ आली आहे. उगवण क्षमता तपासण्याची पद्धतही कृषी विभागाच्यावतीने दिली आहे.
उपलब्ध असलेल्या सोयाबीनपैकी प्रत्येक थैलीतील १० दाणे एका घडी केलेल्या ओल्या कागदारवर ठेवावे. या कागदावर ठेवलेले बियाणे कागदासह पुन्हा एका कागदात गुंडाळावे. गुंडाळलेले हे बियाणे एका प्लास्टिकच्या थैलित ठेवावे. चार दिवसानंतर ते बियाणे काढून पहावे. यात दहा पैकी आठ बियाणे अंकुरल्यास त्याची उगवण क्षमता ८० टक्के समजावी तर सात बियाणे अंकुरल्यास उगवण क्षमता ७० टक्के समजावी असे कृषी विभागाच्यावतीने कळविले आहे. पेरा करताना उगवण क्षमतेनुसार हेक्टरी बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.
पत्रव्यवहारानंतर महाबीजने वाढविले आवंटन
जिल्ह्याच्या कृषी विभागाने महाबीजला सोयाबीनच्या २५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. महाबिजने एवढे बियाणे पुरविण्यास असमर्थता दर्शवित ६ हजार क्विंटल बियाणे पुरविण्याचे कृषी विभागाला कळविले होते. यावर जि.प.चे कृषी विकास अधिकारी एम.एस. खळीकर यांनी केलेल्या पत्रव्यवहारावर महाबीजने जिल्ह्याला आता ८ हजार ८०० क्विंटल सोयाबीन पुरविण्याचे मान्य केले आहे. महाबिज पुरविणार असलेले बियाणे गरजेच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांना घरच्याच बियाण्यांवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.
बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकऱ्यांची फसगत झाली तर त्याच्या तक्रारी नोंदविण्याकरिता तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात शेतकऱ्यांनी होणारा बियाण्यांचा काळाबाजार, लिकिंगची माहिती दिल्यास कारवाई करणे शक्य होईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.