पांदण खुली करण्यासाठी नऊ महिने
By Admin | Updated: August 26, 2014 23:39 IST2014-08-26T23:39:20+5:302014-08-26T23:39:20+5:30
तालुक्यातील मौजा साखरा येथील साखरा ते सावली पांदण रस्ता क्ऱ ३२ वर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण हटवून पांदण मोकळी करावी, अशी मागणी शेतकऱ्याने तहसील कार्यालयात केली होती़

पांदण खुली करण्यासाठी नऊ महिने
वर्धा : तालुक्यातील मौजा साखरा येथील साखरा ते सावली पांदण रस्ता क्ऱ ३२ वर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण हटवून पांदण मोकळी करावी, अशी मागणी शेतकऱ्याने तहसील कार्यालयात केली होती़ याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना अधिकाऱ्यांनी पंचनामा न करता काढता पाय घेतला़ यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़ याबाबत जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदनही देण्यात आले़
वर्धा तालुक्यातील साखरा येथील शेतकरी बबन हागोडे यांचे साखरा येथे वडिलोपार्जीत शेतजमीन आहे़ शेत सर्व्हे क्ऱ १३३/१ आराजी ३़७२ हेक्टर आर शेती आहे़ या शेतावर साखरा ते सावली या पांदण रस्ता क्ऱ ३२ ने ये-जा करता येत होती; पण १ नोव्हेंबर २०१३ रोजी सुनीता जोगळेकर, हेमलता चांभारे व कुसुम चांभारे यांनी अतिक्रमण केले़ यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे़ या प्रकारामुळे त्रस्त शेतकऱ्याने तहसीलदार राहुल सारंग यांना निवेदन सादर केले़ यात सदर पांदण रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली़ शिवाय शेतकरी हागोडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांनाही निवेदन सादर केले़ यावरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार राहूल सारंग यांना आदेश देण्यात आले़ यावरून त्यासंनी नायब तहसीलदार प्रीती डुडुलकर, सेवाग्रामचे मंडळ अधिकारी मंथनवार व तरोडा येथील तलाठी मिलिंद कुलकर्णी यांना कारवाईसाठी पाठविले़
यावरून नायब तहसीलदार डुडुलकर, मंडळ अधिकारी मंथनवार, तलाठी कुलकर्णी हे साखरा येथे दाखल झाले; पण कारवाई न करताच पंचनामा करून परत गेले़ १० ते १५ दिवसांनी पुन्हा येऊन पांदण रस्ता खुला करून देऊ, असेही सांगण्यात आले़ सदर अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार असताना ते परत गेले़ यामुळे शेतकऱ्यावर नागपूरहून भाडेतत्वावर आणलेल्या जेसीबी मशीनचा भुर्दंड बसला़ शिवाय अन्य शेतकरी व हिंगणघाट पोलीस कर्मचाऱ्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला़ अतिक्रमण हटविण्यासाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित केली होती़ अर्जदार व पोलीस बंदोबस्त तयार होता; पण अधिकारी दुपारी ३ वाजता मोक्यावर हजर झाले़ शिवाय पंचनामा करूनच परत गेल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले़
या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह पोलिसांना त्रास सहन करावा लागला़ नऊ महिन्यांचा कालावधी लोटला असताना पांदण रस्ता मोकळा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ हा रस्ता केवळ एकाच शेतकऱ्याला नव्हे तर साखरा येथील अन्य शेतकऱ्यांनाही वहिवाटीसाठी खुला करून देणे गरजेचे आहे़ असे असताना दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांना अडथळा होत आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी हागोडे व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)