एकाच रात्री नऊ घरफोड्या

By Admin | Updated: October 18, 2014 23:41 IST2014-10-18T23:41:56+5:302014-10-18T23:41:56+5:30

शहराजवळील पिपरी (मेघे) परिसरातील प्रगतीनगर, गांजरे ले-आऊट व सिंदी (मेघे) परिसरातील वृंदावननगर तसेच नागठाणा शिवारात शुक्रवारी रात्री अज्ञात १५ ते २५ चोरट्यांनी चांगलीच धुमाकूळ घातली.

Nine burglars at night | एकाच रात्री नऊ घरफोड्या

एकाच रात्री नऊ घरफोड्या

वर्धा : शहराजवळील पिपरी (मेघे) परिसरातील प्रगतीनगर, गांजरे ले-आऊट व सिंदी (मेघे) परिसरातील वृंदावननगर तसेच नागठाणा शिवारात शुक्रवारी रात्री अज्ञात १५ ते २५ चोरट्यांनी चांगलीच धुमाकूळ घातली. चोरट्यांनी रात्रभऱ्यात तब्बल नऊ घरफोड्या केल्या. यात सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात नागठाणा परिसरातील एका महिलेला मारहाण करण्यात आली. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदी (मेघे) येथील वृंदावननगर परिसरात नरेंद्र गावंडे यांच्या घरी शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ चोरट्यांनी आवाज देत दार ठोकले. नरेंद्रच्या आई लता विलास गावंडे यांनी दरवाजा उघडला असता चोरट्यांनी धक्काबुक्की करीत घरात प्रवेश मिळविला. लता यांना चोरट्यांनी काठीने मारहाण करून त्यांच्या घरातील रोख दोन लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण चार लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. नरेंद्र गावंडे यांचा बलून डेकोरेशनचा व्यवसाय आहे. यात चोरीत लता गावंडे जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पिपरी (मेघे) परिसरातील गांजरे ले-आऊट वॉर्ड ४ मध्ये धुमाकुळ घातला. येथे जवळपास १५ ते २० च्या संख्येने असलेल्या अज्ञात चोरट्यांनी अन्नाजी कापसे यांच्या घरातील काहींना मारहाण करीत चाकुच्या धाकावर रोख १० हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले. यांच्या शेजारी असलेले प्रकाश ठाकरे यांच्या घरातून चोरट्यांनी ५० हजारांचा सोन्याचा ऐवज व पाच हजार रुपये रोख बळजबरी चोरून नेली. याच परिसरातील मधुकर काकडे यांच्या घरातून चोरट्यांनी मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. गांजले ले-आऊट मधील राजू त्र्यंबक बाराहाते यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ५०० रुपये, सोन्याचे दागिने चोरून नेले. पिपरी (मेघे) भागातील प्रगतीनगर येथील भानुदास कुनघटकर यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी भानुदास, अनिल व दूर्गा कुनघटकर यांना चाकुचा धाक दाखवत मारहाण करीत सोन्याचे दागिने व १२ ते १५ हजार रुपये रोख लंपास केले. कुनघटकर यांच्या घराजवळच राहणारे निवृत्त पोलीस कर्मचारी प्रभाकर बहेकार यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश घेत पॅन्टमधील ८२५ रुपये, सोन्याचा नेकलेस चोरून नेला. याच भागातील अर्चना मोरे या मुलासह घरी असता चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी अर्चनाला मारहाण करून मुलाला चाकुचा धाक दाखवत येथून रोख दोन हजार रुपये व सोन्याचे दागिने असा ४० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याच परिसरातील घनश्याम गोवर्धन टाक यांच्या पत्नी खुशबु पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेकरिता उठल्या. बाथरूम मधून बाहेर आल्या असता अचानक त्यांना घरात चोरटे असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी येथे धुमाकुळ घालत १५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. प्रगतीनगर येथील चारही घटना पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडल्या.
चोरीची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पाहणी करून श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी शहर ठाण्यात भदंविच्या कलम ३९५, ३९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्यांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nine burglars at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.