खाद्यान्नाच्या तपासणीला बगल
By Admin | Updated: October 20, 2015 02:54 IST2015-10-20T02:54:57+5:302015-10-20T02:54:57+5:30
नागरिकांना सुरक्षित अन्न आणि औषधी मिळावी म्हणून संबंधितांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अन्न व औषधी

खाद्यान्नाच्या तपासणीला बगल
वर्धा : नागरिकांना सुरक्षित अन्न आणि औषधी मिळावी म्हणून संबंधितांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अन्न व औषधी प्रशासन कार्यरत आहे; पण सदर विभागाला जबाबदारीचा विसर पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल, ढाबे, अल्पोपहारासाठी हातबंड्या लावल्या जातात. या खाद्यान्नाची तपासणीच केली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खाद्यान्नाची विक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबे, अल्पोपहार गृहांची नियमित तपासणी करणे गरजेचे असते. ही जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे; पण गत काही वर्षांपासून शहरातील तसेच जिल्ह्यातील खाद्यान्न विक्रेत्यांची नियमित तपासणी केली जात नसल्याचेच दिसून येत आहे. शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये दूषित पाण्याचा वापर होतो. शिवाय तेलामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी येतात; पण याकडे सदर विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. जिल्ह्यात उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या वर्धा शहरातही अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांची हातगाड्यांवर विक्री केली जाते. या छोटेखानी दुकानांची चौकशीच केली जात नसल्याने ते उघड्यावरील खाद्य सार्वजनिक आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक यासह चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने लावली जातात. यातील बहुतांश हॉटेलचे स्वयंपाकगृह बरबटलेले असल्याचे आढळून येते. स्वयंपाकगृहात स्वच्छता आढळून येत नाही. खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. अनेक हॉटेलमध्ये शिळे खाद्य पदार्थदेखील सर्रास विकले जातात. याबाबत अनेकदा नागरिक तक्रारी करतात; पण संबंधित हॉटेलधारकावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.
हॉटेल चालविताना स्वयंपाकगृह स्वच्छ ठेवले जावे, शुद्ध पाण्याचा वापर व्हावा, हॉटेलचा परिसर स्वच्छ असावा, सर्व खाद्यपदार्थ झाकून ठेवलेले असावे यासह अन्य नियमांचे पालन करावे लागते; पण जिल्ह्यातील बहुतांश हॉटेलमध्ये या नियमांना पायदळी तुडविले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. हा प्रकार टाळण्यासाठीच अन्न व औषधी प्रशासन विभागाला हॉटेलची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत; पण सदर विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आरोग्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. खाद्य पदार्थांबाबतच्या अनेक तक्रारींकडे तर दुर्लक्षच केले जाते. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
खाद्य पदार्थांच्या तपासणीपूर्वी भेसळयुक्त खाद्य तेलाची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात खाद्य तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक दुकानांमध्ये कुठल्याही प्रकारचे लेबल नसलेल्या बॅरल, पिंपांमधून खाद्य तेलाची विक्री केली जाते; पण शहरातील अशा तेलाबाबत कुठल्याही प्रकारची पाहणीही अन्न व औषधी प्रशासनाकडून केली जात असल्याचेच दिसून येत आहे.
कुठल्याही प्रकारचे खाद्य तेल तयार करताना ते तीन वेळा ‘फिल्टर’ करणे गरजेचे असते. सध्या बाजारात शेंगदाणा, सोयाबीन, जवस, मोहरी आदी तेलबियांपासून तयार करण्यात येणारे खाद्य तेल बाजारात उपलब्ध असल्याचे दिसते. यातील सोयाबीन हे खाद्य तेल केवळ एकच वेळा फिल्टर केले जाते. सोयाबीन तेल जर तीन वेळा फिल्टर केले तर खाण्यायोग्य तेलच शिल्लक राहत नाही. मग, या तेलामध्ये कास्टिक सोड्याचा वापर केला जात असल्याची माहिती एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. हे तेल आरोग्याकरिता अपायकारक असल्याचेही त्याने सांगितले.
अधिकारी म्हणतात, उद्या सांगेल!
वर्धा शहर व जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे, अल्पोपहारगृह, हातगाड्या यावरील खाद्य पदार्थांच्या तपासणीबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) पवार यांना विचारणा केली असता त्यांनी आता घरी आहे, उद्या सांगेल, असे म्हणत टाळाटाळच केली.
अर्थपूर्ण व्यवहाराची शंका
जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून हॉटेल, अल्पोपहार गृह, ढाबे, कॅटरिंग संस्था यांच्याकडील खाद्यान्नाची तपासणी करणे गरजेचे असते; पण तत्सम तपासणीच होत नसल्याचे समोर आले आहे. अन्न निरीक्षकांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळेच ही तपासणी टाळली जात असावी, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, याची काळजी वाहण्याचा भार असलेला विभागच त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.