४८ तासानंतरही निलंबनाच्या कारवाईला बगल
By Admin | Updated: July 10, 2015 00:19 IST2015-07-10T00:19:20+5:302015-07-10T00:19:20+5:30
रेती व्यावसायिक मृत्यूप्रकरण : तहसीलमध्ये पोलीस बंदोबस्त

४८ तासानंतरही निलंबनाच्या कारवाईला बगल
आष्टी (श.) : गोदावरी येथील श्रीकृष्ण भुयार यांचा तलाठ्याच्या जाचामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणात तलाठ्याचे त्वरित निलंबन करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात पाच तास मृतदेह ठेवला. यावेळी ४८ तासांत कारवाई केली जाईल, असे एसडीओंनी सांगितले; पण त्यानंतरही कारवाई केली नाही. यामुळे मृतकाच्या भावाने अस्थिकलश एसडीओ कार्यालयात नेत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्याने वातावरण तापले.
उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी ४८ तासांत निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. आज ५८ तास संपले; पण कारवाई झाली नाही. कारवाई इतक्या लवकर होणार नाही, असे एसडीओ आंधळे यांनी सांगितले. आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. काँग्रेसच्या निलंबन मागणीवर भाजपाने तलाठी जगताप अत्यंत कर्तव्यदक्ष असून त्यांचे निलंबन त्वरित मागे घेण्याची मागणी केली. यामुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. अकिाऱ्यांनी स्वत: ग्रामस्थांना तक्रार देण्यास भाग पाडल्याची माहिती मृतक श्रीकृष्ण यांचा भाऊ नंदकिशोर भुयार यांनी दिली. अद्यापही कारवाई न झाल्याने मृतकाच्या भावाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी येथे अस्थिकलश घेऊन जात कारवाई होईस्तोवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. परिणामी, तहसील कार्यालयातच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकारामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.
यातच तलाठी जगताप यांना त्वरित निलंबित करावे, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव सचिन वैद्य जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची भेट घेणार आहे. त्वरित कारवाई न झाल्यास एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून तणावाच्या भीतीनेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे प्रशासनाविरूद्ध वातावरण तापले आहे.
उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांना विचारणा केली असता इतक्या लवकर कारवाई शक्य नाही. तहसीलदार यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करू असे सांगितले. या प्रकरणी राजकारण होत असल्याने संवेदनशील घटनेत हस्तक्षेप न करण्याचे आवाहन तहसीलदार मोरे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)