नवा विक्रम; एकाच दिवशी झाल्या तब्बल २२ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST2022-06-12T05:00:00+5:302022-06-12T05:00:06+5:30
शिबिरादरम्यान तब्बल २२ व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्यांमध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी २२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हर्निया, हायड्रोसील, नाभी संबंधीचा हर्निया, जन्मजात हर्निया आणि फिमोसिसची लागण झालेल्या तब्बल २६हून अधिक गरजूंवर वेळीच शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश जुननकर यांना मिळाली.

नवा विक्रम; एकाच दिवशी झाल्या तब्बल २२ शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया, नागपूरच्या पुढाकारातून वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी विशेष शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरादरम्यान तब्बल २२ व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्यांमध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी २२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हर्निया, हायड्रोसील, नाभी संबंधीचा हर्निया, जन्मजात हर्निया आणि फिमोसिसची लागण झालेल्या तब्बल २६हून अधिक गरजूंवर वेळीच शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश जुननकर यांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे व डॉ. प्रवीण धाकटे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ. जुननकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष हे विशेष शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरादरम्यान डॉ. नीलेश जुननकर यांच्यासह डॉ. घनश्याम चुडे, डॉ. बुटानी, डॉ. संदीप हटवार, डॉ. प्रसाद बन्सोड, डॉ. अमित पुजारी यांनी तब्बल २२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. विनोद कुरवले, डॉ. कपिल चव्हाण, डॉ. आशुतोष बाभुळकर यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
चार टेबलवरून झाल्या शस्त्रक्रिया
- शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल २२ व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नवा विक्रम नोंदविण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या या विशेष शस्त्रक्रिया शिबिरादरम्यान तब्बल चार टेबलवरून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
- जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शिबिरादरम्यान प्रसुती शस्त्रक्रिया प्रभावीत होऊ नये म्हणून एक शस्त्रक्रिया कक्ष राखीव ठेवण्यात आला होता.
मी मूळचा वर्धा जिल्ह्यातील. वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिने इंटर्नशिप केली. त्यामुळे आजही मला हे रुग्णालय आपलेच वाटते. शिवाय शासकीय रुग्णालयांचे काही देणे बाकी आहे तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत मी व माझ्या सहकाऱ्यांनी गरजूंवर शस्त्रक्रिया करण्यासाठी होकार दर्शविला.
- डॉ. नीलेश जुननकर, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया, नागपूर
विशेष शस्त्रक्रिया शिबिरादरम्यान शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २२ गरजूंवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी २२ व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही जिल्हा रुग्णालयातील पहिलीच वेळ आहे.
- डॉ. अनिल वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.