मराठा-कुणबी बांधवांनी रचला नवा इतिहास
By Admin | Updated: October 24, 2016 00:19 IST2016-10-24T00:19:18+5:302016-10-24T00:19:18+5:30
मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाने रविवारी वर्धेत इतिहास घडविला. याचे साक्षीदार वर्धेकर ठरले

मराठा-कुणबी बांधवांनी रचला नवा इतिहास
मूकमोर्चा : शिस्त अन् नि:शब्दाचा साक्षात्कार, महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान
वर्धा : मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाने रविवारी वर्धेत इतिहास घडविला. याचे साक्षीदार वर्धेकर ठरले. सकाळी ११ वाजतापासून मूकमोर्चास्थळी मराठा-कुणबी बांधवांचे आगमन सुरू झाले. प्रारंभी अत्यल्प प्रतिसाद वाटत असलेला मूकमोर्चा दुपारपर्यंत हजारोंच्या संख्येत परिवर्तीत झाला. जुने आरटीओ मैदानातून निघालेल्या या मूकमोर्चाची शिस्त अन् नि:शब्दाचा साक्षात्कार आणि महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान वर्धेकरांनी खुल्या डोळ्यांनी अनुभवला.
दुपारी १ वाजता शहिदांना आदरांजली अर्पण करून जुने आरटीओ मैदानातून हा मूकमोर्चा नियोजित मार्गाने निघाला. हा मोर्चा मैदनातून आर्वी नाक्याकडे वळला. यावेळी रस्त्याच्या दूतर्फा वृद्धांसह चिमुकलेही मूकमोर्चाच्या स्वागताकरिता आणि तो डोळ्यात साठविण्याकरिता रस्त्याच्या कडेला हातात ‘एक मराठा, लाख मराठा’ असे भगवे झेंडे घेवून उभे होते. तत्पूर्वी मैदानावर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. जूने आरटओ मैदानात वैष्णवी डाफ आणि धनश्री देशमुख या दोन युवतींनी मूकमोर्चा मागील भूमिका आपल्या मनोगतातून विषद केली. यानंतर यवतमाळ येथील प्रा. प्रवीण देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगतानंतर मूकमोर्चा आपल्या मार्गाने रवाना झाला. मैदानातील स्टेज समोरून राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जिजाऊंच्या वेशभूषेत असलेल्या युवक-युवतींच्या मागे काळ्या रंगाचे वस्त्र व भगवे फेटे परिधान केलेल्या युवतीं, त्यांच्या मागे महिलांची गर्दी त्यांच्या मागे वकील मंडळी, डॉक्टर मंडळी आणि सहभागी मराठी-कुणबी बांधव अशी रचना असलेला हा मूकमोर्चा आपल्या नियोजित स्थळाकडे निघाला.
पाच रस्त्यांचा चौक असलेल्या आर्वी नाक्यावर हा मूकमोर्चा पोहोचला असता मुख्य मार्ग सोडून इतर चारही बाजूने मूकमोर्चा डोळ्यात साठविण्याकरिता नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. मूकमोर्चाचे पुढचे टोक आर्वी नाक्यावर तर शेवटचे टोक मैदानातून होणे बाकीच होते. येथून हा मोर्चा शिवाजी चौकाकडे निघाला. आर्वी नाका ते शिवाजी चौक या मार्गावर रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची उपस्थिती मूकमोर्चाची भव्यता दर्शवित होती. शिवाजी चौकात मूकमोर्चा येण्यापूर्वीच नागरिकांची येथे गर्दी उसळली होती. मोर्चा शिवाजी चौकात पोहोचताच येथे दोन युवतींनी छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौकाकडे निघाला. मुख्यमार्गावर भव्यमोर्चा पाहून अनेक अवाक् झाले. मूकमोर्चात सहभागी बांधवांकरिता कुण्या एका समाजाने नाही तर सर्वच समाजाच्या बांधवांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. यात विशेषत: मुस्लिम समाजातील नागरिकांचाही यात महत्त्वपूर्ण सहभाग बघायला मिळाला.