योजनांच्या माध्यमातून विकासाला नवी दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 01:52 IST2015-04-29T01:52:01+5:302015-04-29T01:52:01+5:30
विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. प्रत्येक योजना आपल्या गावात यावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक ..

योजनांच्या माध्यमातून विकासाला नवी दिशा
वर्धा : विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. प्रत्येक योजना आपल्या गावात यावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक सतर्क असल्यास गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड यांनी केले.
हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांसाठी माहिती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे, पंचायत समितीचे उपसभापती मिलिंद कोपुलवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र भुयार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. राजू, भूजल सर्वेक्षणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे भालेराव, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक एस.एस. करे, पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना तिमांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला करपाते, पंचायत समिती सदस्य रमा कांबळे, समुद्रपूरचे गटविकास अधिकारी ए. एस. वायाळ, हिंगणघाटचे गटविकास अधिकारी विजय धापके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेला उपस्थित लोकप्रतिनिधींना योजनांची माहिती देताना राठोड यांनी मानसाच्या जन्मापूर्वी ते निराधारापर्यंत विविध शासकीय योजना आहेत. विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवून ग्रामीण भागाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर बोलताना राजेंद्र भूयार यांनी ग्रामपंचायत, ग्रामविकासाची कामे, करवसूली, गोठे बांधकाम, वर्गीय कंपोस्ट, सिंचन विहिर, शौचालय बांधकामांची कामे आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच माहिती अभियान कार्यशाळेवर प्रकाश टाकला. तर सभापती संजय तपासे यांनीही कार्यशाळेतून देण्यात येणारी माहिती उपयुक्त असल्याचे सांगितले. वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी वर्धा पॅटर्न, पाण्याचे महत्व, पाण्याची बचत या विषयांवर मार्गदर्शन केले. ग्रामीण विकास यंत्रणेचे भालेराव यांनी कामधेनू दत्तक ग्राम योजना, पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच करे यांनी वनजमीन, वनामध्ये प्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई, शेतजमिनीची भरपाई, अपंगत्व आदी विषयांवर सविस्तर योजनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. संचालन विनेश काकडे यांनी केले तर आभार विजय धापके यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)