विधान सभेच्या पार्श्वभूमीवर ठरणार नवा नगराध्यक्ष
By Admin | Updated: July 17, 2014 00:16 IST2014-07-17T00:16:04+5:302014-07-17T00:16:04+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धेचा नव्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नवे नगराध्यक्षपद अनुसूचित

विधान सभेच्या पार्श्वभूमीवर ठरणार नवा नगराध्यक्ष
राजेश भोजेकर - वर्धा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धेचा नव्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नवे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या प्रवर्गातील एक नगरसेवक त्रिवेणी कुत्तरमारे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तर काँग्रेसकडे योगिता बागडे आणि वर्षा खैरकार यांच्या रुपाने दोन दावेदार आहेत. यापैकी कोण नव्या नगराध्यक्ष होणार यापेक्षा त्या राष्ट्रवादी की काँग्रेसच्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
पालिकेवर राकाँ, बसपा व अपक्षाच्या साह्याने भाजपचा झेंडा आहे. नव्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ही अभद्र युती कायम राहिल्यास राकाँच्या त्रिवेणी कुत्तरमारे या मजबूत दावेदार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असल्यामुळे राष्ट्रवादी भाजपशी हातमिळवणी करुन आपला नगराध्यक्ष विराजमान करतो वा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेस या आघाडीतील मित्र पक्षाशी नव्याने हातमिळवणी करुन नगराध्यक्षाची निवडणूक लढते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राकाँ आणि काँग्रेस आघाडी एकत्र आल्यास नगराध्यक्ष कुणाचा हा नवा वाद पुढे येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यताही नाकारता येणारी नाही. तेव्हा भाजपशी हातमिळवणी करायची वा काँग्रेस या मित्रपक्षाला जवळ करायचे, अशा द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सापडली आहे. नगर पालिकेत काँग्रेस-१३, राकाँ-९, भाजपा - ८, बसपा - ४, सेना -१, गुलशन आघाडी - ३, अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष पदाच्या मागील निवडणुकीतील चित्र कायम राहते वा नवे समीकरण जुळून येते, यावरच नव्या नगराध्यक्षाचा चेहरा पुढे येणार आहे.