आज ठरणार पंचायत समित्यांचे नवे सभापती, उपसभापती
By Admin | Updated: September 14, 2014 00:03 IST2014-09-14T00:03:29+5:302014-09-14T00:03:29+5:30
जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक रविवार १४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे.

आज ठरणार पंचायत समित्यांचे नवे सभापती, उपसभापती
वर्धा : जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक रविवार १४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
निवडणुकीची ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता प्रशासनाच्यावतीने अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात वर्धा पंचायत समितीच्या सभागृहात अध्यासी अधिकारी म्हणून वैभव नावडकर, सेलू येथे एस़बी़ जाधव, देवळी येथे हरीश धार्मिक, हिंगणघाट येथे घनश्याम भूगावकर, समुद्रपूर येथे शैलेंद्र मेश्राम, आर्वी येथे रवींद्र ठाकरे, आष्टी (शहीद) येथे विपुल जाधव आणि कारंजा (घाडगे) येथे राजेंद्र भुयार काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)
दुपारी १२ वाजतापर्यंत अर्ज व २ वाजता निवडणूक
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत सभापती व उपसभापती पदाकरिता अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी २ वाजतापर्यंत सभागृहात विशेष सभा होवून त्यात सभापती व उपसभापतीची निवड होणार आहे. यात उपस्थित सदस्य हात उंचावून उमेदवाराला मतदान करणार आहेत.
आरक्षणानुसार राजकीय पक्षांची तयारी
रविवारी होणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता उमेदवारांची नावे जवळपास पक्की झाली आहेत. समितीत पक्षीय ताकदीवरून नेत्यांनी सभापती आपलाच व्हावा, याकरिता पूर्ण तयारी केली आहे. वर्धेतील देवळी, आष्टी, आर्वी, हिंगणघाट, वर्धा येथील चित्र स्पष्ट असले तरी समुद्रपूर, सेलू आणि कारंजा येथील परिस्थिती वेळेवर ठरणारी आहे. यात कारंजा व सेलू येथे वेळप्रसंगी इश्वर चिठ्ठी निघण्याचे चित्र आहे. तर समुद्रपूर येथे अभद्र युती होण्याची शक्यता आहे. ही युती झाली तर ठरल्याप्रमाणे सभापती व उपसभापती यांची निवड होईल अन्यथा अडचणी निर्माण होण्याचे चित्र आहे.