नागरिकांच्या सेवेत नवीन ११ सुसज्ज रुग्णवाहिका
By Admin | Updated: September 1, 2014 23:47 IST2014-09-01T23:47:22+5:302014-09-01T23:47:22+5:30
आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने सर्वसामान्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्या सुविधा अत्याधुनिक कशा करता येतील याचा प्रयत्न सुरू असताना शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात

नागरिकांच्या सेवेत नवीन ११ सुसज्ज रुग्णवाहिका
शासनाचे आदेश : इमरजन्सी मेडिकल सर्व्हीस सुरू
वर्धा : आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने सर्वसामान्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्या सुविधा अत्याधुनिक कशा करता येतील याचा प्रयत्न सुरू असताना शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात इमरजन्सी मेडिकल सर्व्हीस सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना सोयी सुविधा मिळाव्या याकरिता जिल्ह्यात नवीन ११ सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्या अपघात प्रवण स्थळ असलेल्या परिसरातील रुग्णालयात पाहोचत्या करण्यात आल्या आहेत.
अपघात झाल्यावर पहिल्या तासाला ‘गोल्डन हवर’ असे वैद्यकीय भाषेत बोलले जाते. या काळात जर रुग्णाला उपचार मिळाला तर त्याचे प्राण वाचविणे शक्य होते. हाच ‘गोल्डण हवर’ हाताळण्याकरिता शासनाच्यावतीने ‘इमरजन्सी मेडिकल सर्व्हीस’ सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता १०८ हा दुरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. यावर भ्रमणध्वनी व दुरध्वनीवरून संपर्क साधल्यास या सेवेचा लाभ मिळणार आहे.
शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत ही सुविधा जिल्ह्यात पुरविण्यात येत आहे. या सेवेकरिता तळेगाव (श्यामजीपंत), सेलू (नागपूर-वर्धा मार्ग), हिंगणघाट (नागपूर वर्धा हायवे), समुद्रपूर (जाम-नागपूर हायवे), पुलगाव, खरांगणा (मो.) आर्वी, भिडी, कारंजा (घाडगे) या ठिकाणी बीएलएस (बेसीक लाईफ सेक्युरीटी) तर वडनेर (नागपूर-हैदराबाद महामार्ग) व वर्धा येथे एएलएस (अॅडव्हान्स लाईफ सेक्युरिटी) सुविधा असलेल्या या रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या जुन्या रुग्णवाहिका साध्या असल्याने त्यातून केवळ रुग्णवाहतूक होत होती. रुग्णावर उपचार करण्यात येत नव्हते. आता रुग्णवाहिकेतच रुग्णावर उपचार करणे शक्य आहे.(प्रतिनिधी)