‘अपघात प्रवण स्थळाच्या’ दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By Admin | Updated: November 29, 2015 02:55 IST2015-11-29T02:55:53+5:302015-11-29T02:55:53+5:30

सेलू ते हिंगणी मार्गावर किन्ही गावालगतच असलेल्या अपघातग्रस्त स्थळाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

Neglecting the construction department in 'Accidental Impact' | ‘अपघात प्रवण स्थळाच्या’ दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

‘अपघात प्रवण स्थळाच्या’ दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सेलू ते हिंगणी रस्त्याची व्यथा : रहदारी वाढल्याने पर्यटकांना अपघाताचा धोका
बोरधरण : सेलू ते हिंगणी मार्गावर किन्ही गावालगतच असलेल्या अपघातग्रस्त स्थळाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
अपघातग्रस्त ठिकाण किन्ही बसस्टॉपजवळच असून परिसरातील शेतातील पाणी नदीमध्ये वाहून जाण्यासाठी सिमेंट पायल्या टाकून लहान पूल तयार करण्यात आला होता. वाढलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे तीन ते चार वर्षांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजू खचल्याने ये-जा करण्याचा मार्ग अरूंद झाला आहे. तीन वर्षांपूर्वी घोराडच्या इसमाचा कारने येथेच अपघाता झाला होता. तेव्हा तत्कालीन सरपंच अमर धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा केला होता. यावरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली; पण अद्याप प्रत्यक्षात कृती करण्यात आलेली नाही. यानंतरही येथे अनेक लहान-मोठे अपघात झालेत.
सेलू ते हिंगणी मार्ग हिंगणा -वाडीसाठी जवळचा मार्ग आहे. बोर अभयारण्यात जंगल सफारीसाठी वाढलेली पर्यटकांची संख्या यामुळे या मार्गाने वाहनांचे प्रमाण भरपूर वाढले आहे. पर्यटक बाहेर जिल्ह्यातून येत असल्याने त्या जागेबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मागील पंधरवड्यात हिंगणी येथील दुचाकीस्वाराचा याच ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी अमर धोटे व नागरिकांनी चुन्याने दगड रंगवून दोन्ही बाजुला लावले होते; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही अपघात प्रणव स्थळाबाबत दिशा दर्शक फलक लावण्याचे सौजन्य दाखविले नाही.
बोर व्याघ्र प्रकल्पामुळे या मार्गावर रहदारी वाढली आहे. दररोज पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेटी देण्याकरिता येतात; पण रस्त्याची दुरवस्था आणि अपघाताची भीती यामुळे प्रवाश्यांची कुचंबना होते. लोकप्रतिनिधींनीही अद्याप या अपघात प्रवण स्थळाकडे लक्ष दिले नसल्याचेच दिसून येत आहे. यापूर्वी एक अपघात झालेला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी नवीन पायल्या टाकून दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.(वार्ताहर)

Web Title: Neglecting the construction department in 'Accidental Impact'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.