काकडदराच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:42 PM2017-10-23T23:42:44+5:302017-10-23T23:43:08+5:30

तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या स्मृतीदिनानिमित्त काकडदरा ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

The neglect of government on the problems of Kakadadar | काकडदराच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

काकडदराच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देग्रामस्थांची खंत : श्रीकृष्णदास जाजू स्मृती कार्यक्रमात साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या स्मृतीदिनानिमित्त काकडदरा ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी काकडदरा गाव पाणीदार झाले असले तरी या गावाच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. लोकप्रतिनिधींकडे आजपर्यंत पाठपुरावा करण्यात आला; पण आश्वासनाच्या पलीकडे ग्रामस्थांच्या पदरात काहीही पडले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना काकडदरा गावात पहिल्यांदा जलसंधारणाचे काम सुरू करणारे मधुकर खडसे यांनी काकडदरा गाव पाणीदार ठरल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या गावातील ग्रामस्थांच्या परिश्रमाचे हे फळ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या गावातील नागरिकांनी फार पूर्वीपासून श्रमदानाची कास धरली, असे ते म्हणाले. यावेळी सुरुवातीच्या काळात असेफाच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत रेखा मोरे यांनी आपल्या सासºयांनी ५०० एकर जमिनीपैकी १०० एकर जमीन या गावात सध्या वास्तव्य असलेल्या लोकांना दिली. काकडदरा गावातील कोलाम समाजाच्या लोकांनी त्यावेळी चांगल्या पद्धतीने काम केले. खडसे व मोरे यांना त्यावेळी लोक देवदूत मानत होते व जमिनदाराप्रतिही ग्रामस्थांची सद्भावना होती, असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
काकडदरा गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत महाराष्टÑात प्रथम क्रमांक पटकाविला असला तरी या गावात जलसंधारणाचे काम हे १९८६ मध्येच सुरू झाले होते. त्यावेळी मधुकर खडसे यांच्या मार्गदर्शनात घनश्याम भिमटे यांनी गावात राहून लोकांना या कामासाठी प्रोत्साहित केले व गावाला आदर्श बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. घनश्याम भिमटे यांनी या गावाच्या पूर्व इतिहासावर प्रकाश टाकला. गावाने शिक्षणात प्रगती साधली आहे. पाणीदार गावात अनेक चांगल्या गोष्टी निर्माण झाल्यात, असेही ते म्हणाले. सुरुवातीला पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक डॉ. उल्हास जाजू यांनी केले. त्यांनी काकडदरा गावातील काम करणाºया सर्वांचा परिचय करून दिला.
यावेळी मंदार देशपांडे यांनी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना प्रशिक्षण देण्यात आले होते. काकडदराच्या या यशात महिलांचा सहभाग सर्वाधिक राहिला. दररोज ८० महिला श्रमदान करीत होत्या. काहींना शासनाच्या रोहयोतून मजुरी देण्यात आली; पण ही मजुरी कमी होती. तरीही लोकांनी श्रमदान केले, अशी माहिती त्यांनी दिली. काकडदराने हे यश मिळविले असले तरी सालदरा-काकडदरा या गावांना जोडणाºया पांदण रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही. एका बाजूचे काम आता सुरू झाले आहे. गावात आरोग्य केंद्र नाही. शिवाय दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी शाळा नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासोबतच गावातील तरुणांना शिक्षणाकडे वळविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला मधुकर खडसे, सुधा खडसे, दौलत घोरनाडे, शंकर आमिलकंठवार, मुख्याध्यापक विकास वाटकर, प्रकाश रामगडे, ज्ञानेश्वर चोरामले, गणेश रामगडे, ग्रामसभा अध्यक्ष नामदेव मुंडेकार, प्रफुल्ल दाभेकर, चंद्रशेखर सयाम, दर्शन टेकाम, माजी सरपंच बेबी कुरझडकर, सुनीता दाभेकर, घनश्याम भिमटे, रेखा मोरे, पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे, भूषण कडू, कुणाल परदेशी, चिन्मय फुटाणे यांच्यासह डॉ. उल्हास जाजू, डॉ. सुहास जाजू व जाजू परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
बक्षिसाची रक्कम अद्यापही अप्राप्त
काकडदरा गावाला वॉटर कप स्पर्धेत ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला असला तरी या पुरस्काराची रक्कम अद्याप ग्रामसभेला मिळालेली नाही. ग्रामसभेच्या नावाचे पॅन कार्ड तयार करण्यात न आल्याने रक्कम मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामस्थांच्यावतीने गावातील कामाची चित्रफित तयार करून आमिर खान यांना पाठविण्यात आली आहे. त्यांना काकडदरा येथे येण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दहा वर्षांपूर्वी सुरू केले होते काम
गावच्या माजी सरपंच बेबीताई कुरझडकर यांनी आपण सरपंच पदावर असताना गावातील विहिरीवर दोन मोटारी बसविल्या होत्या. तसेच दोन स्टार्टरही खरेदी केले होते. त्यावेळीही जलसंधारणाचे काम करण्यात आले. २०१३ मध्ये अतिवृष्टी झाल्याने त्यापूर्वी झालेले सर्व काम वाहून गेले व आता वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वाहून गेलेले काम नव्याने तयार करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
गावातील प्रकाश रामगडे यांनी गावाने वॉटर कप स्पर्धेत पारितोषिक मिळविले असले तरी पुढील काळात गावात पाणलोटची कामे सुरूच राहणार आहे. सेंद्रीय शेतीवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक विकास वाटकर यांनी सहाव्या वर्गासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: The neglect of government on the problems of Kakadadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.