पर्यावरणाच्या रक्षणार्थ वृक्ष लागवड आवश्यक
By Admin | Updated: June 20, 2016 01:58 IST2016-06-20T01:58:22+5:302016-06-20T01:58:22+5:30
राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.

पर्यावरणाच्या रक्षणार्थ वृक्ष लागवड आवश्यक
रामदास तडस : दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प
वर्धा : राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. या वृक्ष लागवडीकरिता सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच वैयक्तिक या सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. जागतिक तापमान व प्रदूषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हवामान, ऋतू बदल व त्यातून वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई यांची दाहकता व परिणामकारकता कमी करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही खा. तडस यांनी नमूद केले आहे.
सध्या पर्यावरण धोक्यात आले, अशा प्रकारची हाकाटी सतत ऐकत असतो; पण पर्यावरणाची बिघडलेली परिस्थिती सुधारणे कसे शक्य होईल, ती सुधारणा कशी करायची, याबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. बिघडलेल्या पर्यावरणात सुधारणा करणे शक्य आहे काय, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. महाराष्ट्र शासनाचे पाऊल पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण एक रोपटे लावले तर ते ५० वर्षांपर्यंत आपल्याला १७.५० लाख रुपयांचे आॅक्सीजन, ४१ लाख रुपयांचे पाण्याचे रिसायकलींग, ३५ लाख रुपयांचे प्रदूषणावर नियंत्रण, दरवर्षी ३ किलो कार्बनडाय आॅक्साईड शोषण करते. ३ टक्के तापमान कमी करते. यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली तर ते वृक्ष ५० वर्षे पर्यावरणाला मदत करतील. एक वृक्ष एवढी मदत करतो तर महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लावल्यावर राज्य प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प करावा, राज्य शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प बळकट करावे, असे आवाहनही खा. तडस यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)