महिलेच्या हाडात मोडली ‘सुई’
By Admin | Updated: July 13, 2015 02:09 IST2015-07-13T02:09:09+5:302015-07-13T02:09:09+5:30
पोटात दुखत असल्यामुळे येळाकेळी येथील महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. तिला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करावी लागते असे सांगत दाखल करून घेण्यात आले.

महिलेच्या हाडात मोडली ‘सुई’
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार
आकोली : पोटात दुखत असल्यामुळे येळाकेळी येथील महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. तिला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करावी लागते असे सांगत दाखल करून घेण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्र्वी तिला परिचारिका गुंगीचे इंजेक्शन देत असताना सुईचा तुकडा तिच्या हाडात मोडला. त्यामुळे तीन दिवसांपासून ती महिला वेदनेने विव्हळत आहे. गुरुवारी (दि.२) दाखल झालेल्या या महिलेवर शनिवारीही शस्त्रक्रिया झाली नसल्याचे दिसून आले.
सविस्तर वृत्त असे की, येळाकेळी येथील शोभा शंकर भांडेकर (५०) ही महिला पोटात वेदना होत असल्याने सामान्य रुग्णालयात आली. सर्व तपासण्याअंती व एक्स-रे रिपोर्टनुसार गर्भपिशवीचे आॅपरेशन करावे लागते. असे सांगत तिला वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेची तारीख १० जुलै ठरविण्यात आली. या दिवशी तिला शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्र्वी तिच्या कमरेच्या हाडात परिचारिकेने गुंगीचे इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन देत असताना सुईचा तुकडा महिलेच्या हाडात तुटला. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात येताच शस्त्रक्रिया रद्द करून तिला वॉर्डात पाठविण्यात आले.
तीन दिवसांपासून ती महिला वेदनेने विव्हळत असून तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिच्या तडफडण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. असे असले तरी रुग्णालयात यावेळी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून यावर उडवाउडविची उत्तरे मिळत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून हलगर्जीपणाने कळस गाठला असून याचा त्रास रुग्णांना होत असल्याची ओरड होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.(वार्ताहर)