समग्र विकासासाठी समाजवादी विचारांची गरज
By Admin | Updated: July 25, 2015 02:21 IST2015-07-25T02:21:54+5:302015-07-25T02:21:54+5:30
विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत.

समग्र विकासासाठी समाजवादी विचारांची गरज
वर्धा : विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक समग्र विकासाच्या समाजवादी विचारांची वाढ झाल्याशिवाय देशाचा समग्र विकास होणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्ता केले
किसान अधिकार अभियानच्या वतीने आयोजित बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार तर अतिथी म्हणून मुख्य प्रेरक अरविंद काकडे, उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सुराणा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. देशात गरिबी, अस्पृश्यता, जातीयता, धर्मांधता, अशिक्षितपणा, जमीनदारी प्रथा मोठ्या प्रमाणात होत्या. प्रत्येकाच्या हाताला काम, सर्वांना शिक्षण, जमिनीचे समान वाटप, शेती व उद्योगांचा विकास, सिंचन प्रकल्पांची निर्मिती हे आव्हान तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात देशाने स्वीकारले होते. जवाहरलाल नेहरूचे भारताच्या निर्मितीसाठी असलेले योगदान आपण विसरू शकत नाही. शेतीच्या विकासासोबतच उद्योगांच्या विकासाला चालना देणे त्यावेळी आवश्यक होते.
ग्राम विकासासाठी सिंचन प्रकल्पांचा विकास, शेतीसाठी कर्जाची उपलब्धता व सामाजिक विकासाचे पंचवार्षिक नियोजन नेहरू यांनी केले. जमीनदारी नष्ट करण्यासाठी घटनेत कलम नऊमध्ये तरतूदही त्यांनी करवून घेतली.
पुढील काळात आपल्याला निवडणूक सुधारणा, प्रमाणशीर, प्रतिनिधित्व, समग्र विकासाचे धोरण, सामाजिक समता, जागतिकीकरणाला विरोध व सामाजिक सहकारी तत्वांच्या विकासाच्या आधारे योजना व धोरण आखूनच देशाचा विकास करणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले, शेतकरी व असंघटीत क्षेत्रातील नागरिकांवर वाढत असलेले अन्याय व शोषण भीषण आहे. धर्मनिरपेक्ष विचारांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून न्याय व्यवस्था वेशीला टांगून धर्माध, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, चोऱ्या व बलात्कार करणाऱ्यांना सध्या वाव मिळत आहे. शासन व्यवस्था अन्याचाच्या बाजूने झुकलेली आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात सामाजिक चेतना जागविण्याची व लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी संघर्षाची गरज असल्याचे ते म्हणाले. पवार यांनीही हक्कासाठी संघर्ष करणाची गरज व्यक्त केली.
शेतकरी वर्गाची स्थिती सध्या खूप नाजूक आहे. शासनाकडून शेतमालाला भाव न मिळणे व निसर्गाचा बेभरवशीपणा यामुळे शेतकरी हिताची भूमिका शासनाने घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत जगदीश चरडे, बाबाराव ठाकरे, मंदा ठाकरे, किरण राऊत, मंगेश शेंडे, ज्ञानेश्वर ढगे, पांडूरंग डहाके, भाऊराव काकडे, विनायक तेलरांधे, गोविंदा पेटकर, प्रमोद नरसेकर, दुर्गाप्रसाद मेहेरे, सुनील सावध, किशोर जगताप, राजेश्वर ताजणे, मयुर राऊत, अमर काकडे उपस्थिती होते.(शहर प्रतिनिधी)